सांगली : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर खडसे यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. खडसे यांच्या टीकेनंतर विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी खडसे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करणे ही भाजपची संस्कृती नाही, अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते दरेकर सांगली जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. आज बुधवारी सकाळी त्यांनी आटपाडी तालुक्यातील झरे आणि करगणी परिसरात शेतीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी खडसे यांना प्रत्युत्तर दिले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ते म्हणाले, भाजपने एकनाथ खडसे यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय केला नाही. त्यांनी घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य काळच ठरवेल. पण पक्ष सोडत असताना ज्या पक्षाने मोठे केले त्याच पक्षावर आरोप करणे योग्य नाही, ‘खडसे यांचे आता उतार वयातील राजकारण आहे. त्यामुळे खच्चीकरण केले की पक्षाने मोठे केले. हे महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यांच्या जाण्याने पक्षाला काही होणार नाही.
भाजपमध्ये एकनाथ खडसे यांच्यावर कोणताही अन्याय झाला नाही. भाजपचे सरकार असताना नऊ खाती खडसे यांच्याकडे होती. हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले, असेही प्रवीण दरेकर म्हणाले. मुख्यमंत्र्यांचे पाहणी दौरे रेड कार्पेटवरून होत आहेत. या दौऱ्यातून काही साध्य होणार नसेल तर त्यांनी घरातच बसावे. मात्र, शेतकऱ्यांसाठी लवकरात लवकर मदतीची घोषणा करावी, अशी मागणी केली.