नवी दिल्ली : शिक्षकाची नोकरी मिळविण्यासाठी बीएड, डीएड केले जाते. पण, गरजु किंवा हुशार उमेदवार वशिलेबाजीमुळे मागे राहतो आणि तिसराच व्यक्ती शिक्षक बनून जातो. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी ही पद्धत थांबविण्यासाठी शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) घेण्याचा निर्णय घेतला होता. पण शिक्षक झालेल्यांसाठी ही परिक्षा सक्तीची तसेच नव्या उमेदवारांसाठी अडचणीची ठरू लागली होती. केंद्र सरकारने आता यावर मोठा दिलासा दिला आहे.
शिक्षकाची नोकरी लागलेल्यांसाठी सुरुवातीच्या काळात टीईटी परिक्षा देणे बंधनकारक केले होते. तसेच टीईटी परिक्षा दरवर्षी घेतली जात होती. एकदा ही परिक्षा पास झाला की सात वर्षे हे उत्तीर्ण सर्टिफिकिट लागू राहत होते. पण आता याबाबत केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. टीईटी परिक्षा एकदा उत्तीर्ण झाल्यानंतर त्या उमेदवाराला आयुष्यात पुन्हा कधीही टीईटी परिक्षा द्यावी लागणार नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वशिलेबाजीने अनेक राज्यांमध्ये नोकरी लागल्यामुळे शिक्षण व्यवस्थेचे धिंडवडे निघाले होते. बऱ्याच शिक्षकांना साधे पाढे येत नसल्याचे सरकारी पाहणीत आढळून आले होते. तर अनेकांना इंग्रजी स्पेलिंग येत नसल्याचेही समोर आल्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता कमालीची ढासळली होती. शिक्षक भरतीचे मोठमोठे घोटाळे उत्तर प्रदेश, बिहारमध्ये उघड झाले आहेत.
प्रतिभावान उमेदवारांना टीईटीमुळे शिक्षकाची नोकरी मिळविणे सोपे झाले आहे. यात आता आणखी एक दिलासा मिळाला आहे. टीईटी परिक्षा आयुष्यभरासाठी केंद्र सरकारने मान्य केल्यामुळे सात वर्षे नोकरी न मिळाल्यास पुन्हा गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी पुन्हा परिक्षा देण्याची वेळ उमेदवारांवर येणार नाही.
नियमांमध्ये बदल नॅशनल काऊंसिल फॉर टिचर एज्युकेशन (एनसीटीई) द्वारे करण्यात आले आहेत. केंद्र सरकारसह राज्य सरकारांनाही हे नियम लागू होणार आहेत. एनसीटीई नियमांवरच दोन्ही सरकारांच्या परिक्षा या होतात. केंद्र सरकारसाठी सीबीएसई आणि राज्य स्वत:च परिक्षा आयोजित करतात. या नव्या निर्णयाचा फायदा महिलांना होणार आहे.