बीड : मी घर बदलणार नाही आहे तिथं आहे, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भगवान भक्तीगड येथील दसरा मेळाव्यात बोलताना पक्षांतरांच्या चर्चांना पूर्णविराम दिला. आता राष्ट्रीय मंत्री झाली आहे. पक्षाच काम देशाच्या पातळीवर करणार असल्याचं पंकजा मुंडेंनी दसरा मेळाव्यात स्पष्ट केले.
एकनाथ खडसे यांनी भाजप सोडल्यानंतर पंकजा मुंडेंनी शिवेसेनेत प्रवेश करावा, असं माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं होतं. दसरा मेळाव्यानिमित्त ऑनलाइन मेळावा असूनही राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक भगवानगडावर आले. यावेळी ‘कोण आली रे कोण आली… महाराष्ट्राची वाघीण आली’, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.
पंकजा मुंडेंनी कार्यकर्त्यांना तुम्ही धीर सोडू नका, कुठलाही व्यक्ती पक्षापेक्षा मोठा होऊ शकत नाही. पक्षाचा विचार मोठा असतो, पण गोपीनाथ मुंडेसाहेब हे पक्षापेक्षा मोठे झाले, त्यांचं नाव पक्षातलेच नाही तर विरोधीपक्षातले लोकंही घेतात, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
“पहिले मी वाट्टेल तेवढा निधी द्यायचे. निधीच्या रुपात पैशांचा पाऊस पाडला. आता रस्त्यावर उतरुन आम्ही सरकारला जाब विचारणार. या सरकारचं चांगल्या कामांचं कौतुक करण्याचं धारिष्ट्य गोपीनाथ मुंडेंच्या कन्येत आहे. त्याचप्रमाणे या सरकारला जाब विचारण्याचं धारिष्ट्यदेखील आहे. हे धारिष्ट्य तुम्हा सगळ्यांच्या बळावर आहे. माझं जीवनच तुम्हाला अर्पण आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“मुंडे साहेब जिल्हा परिषदेलाही उभे नव्हते. भाजपचं सरकार येईल, असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं, तेव्हा मुंडे साहेबांनी राजकीय जीवनाला सुरुवात केली. तेव्हा मित्रांसोबत बसून मी शिवाजी पार्क भरुन सभा घेणार, असं बोलले होते. मुंडे साहेबांच्या संघर्ष यात्रेचा समारोप शिवतीर्थावर झाला. त्यामुळे शिवतीर्थावर एक दिवस मी सभा घेतल्याशिवाय राहणार नाही”, असा निश्चय पंकजा मुंडे यांनी केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानातून सावरण्यासाठी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. मुख्यमंत्र्यांचे त्याबद्दल अभिनंदन करते. मात्र, ही मदत पुरेशी नाही, सरकारने अजून मदत करावी, असं पंकजा मुंडेंनी म्हटले आहे.
* विरोधकांनी ही जनसंपत्ती पहावी
दसऱ्या मेळाव्यानिमित्त ऑनलाइन मेळावा असूनही राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक भगवानगडावर आले. आज माझ्याकडे कोणतंही पद नसताना लोक आले, असं सांगतानाच निवडणुकीनंतर काही लोकांना वाटलं पंकजा मुंडे संपल्या. ज्यांना मी संपले असं वाटत होतं त्यांनी ही जनसंपत्ती जरूर पाहावी, असा टोला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी विरोधकांना लगावला.