मुंबई : सरकार स्थापन झाल्यापासून मी ऐकतोय सरकार पडेल, सरकार पडेल. आजही मी म्हणतो, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला सुरूवात केली. मुख्यमंत्र्याचा मास्क उतरवून बोलणार म्हटले होते, त्यानुसार आज बोलत असून शब्द इकडे-तिकडे होईल म्हणत त्यांनी कंगना, राणे, राज्यपाल, पंतप्रधान असे अनेकांवर भाष्य केले.
राज्याची सत्ता हस्तगत केल्यानंतर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा आज रविवारी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात पार पडला. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी मेळाव्याचं आयोजन करण्याची शिवसेनेची परंपरा असते. पण यंदाच्या वर्षी कोरोना साथीमुळे हा मेळावा होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह होतं. अखेर हा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात घेतला गेला.
* राणेंची बेडकाशी तुलना
अनेक दिवसांपासून राज्य सरकार व शिवसेनेवर टीका करत असलेल्या भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यावर राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खरपुस शब्दात समाचार घेतला. ठाकरे यांनी नारायण राणे यांची तुलना बेडकाशी करत उत्तर दिलं.
उद्धव ठाकरे म्हणाले,”प्रत्येक दसरा मेळाव्याला काय बोलणार असं विचारलं जातं. पण, टार्गेट करण्यासाठी नाही. पण, सध्या करोना जोरात आहे. बिहारमध्ये मोफत लस देणार आहेत. काही जणांना इंजेक्शन द्यावं लागतं. काही जणांना तर माणसाचं नाही, तर गुरांचं इंजेक्शन द्यावं लागतं. काही जण तर अशी बेडक आहेत. तुम्हाला माहिती आहे, एक बेडूक आणि त्याची दोन पोरं. या पक्षातून त्या पक्षात. या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यांनी बाबांना सांगितलं. बाप आवाज काढतोय पण, आवाज काही,” अशी टीका ठाकरे यांनी केली.
* कंगनाचा राणावतचा समाचार
मुंबई आणि महाराष्ट्रावर टीका करणाऱ्या कंगना रानावत हिचा देखील अप्रत्यक्ष समाचार उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात घेतला. मुंबईत येऊन नाव कमवायचं आणि मुंबईची बदनामी करायची हे चांगले नाही या शब्दात टीका करत उद्धव ठाकरे यांनी गांजाची शेती कुठे होते ते तुम्हाला माहिती आहे, असा टोला देखील लगावला. सुशांत सिंह याच्या आत्महत्येवरून राजकारण करणाऱ्यांना देखील यावेळी त्यांनी टोला लगावला. बिहारच्या मुलाच्या आत्महत्येचं राजकारण करताना महाराष्ट्राच्या मुलावर आरोप करण्यात आले, असंही ते म्हणाले.
* तुमच्याच तोंडाला – धोतराला गोमुत्राचा वास येतोय
भाजपला चिमटा घेत आरएसएस प्रमुख मोहन भागवतांचे तरी म्हणने एैका असा संदेश देत आमच्या हिंदुत्वावर बोलण्यापेक्षा भागवतांनी आज दिलेल्या हिंदुत्वाच्या भाषणाचा काळ्या टोपी खालील डोक्यात विचार तरी करा असे म्हणाले.माय मेली तरी चालेल पण गाय जिवंत राहिले पाहिजे हे आमचे हिंदुत्व नव्हे,मंदिर सुरु न करण्यावर जे टिका करतात त्यांनी किमान संघाच्या हिंदुत्वाचा अभ्यास करावा अशा खरमरीत भाषेत ठाकरे यांनी भाजपला टोमणे हाणले.
तुमच्याच तोंडाला आणि धोतराला गोमुत्राचा वास येतोय त्याला मी काय करु. पण तुम्ही आमच्या अंगावर येत आहात. ही महाराष्ट्र द्वेष्टी औलाद बघितल्यानंतर मी महाराष्ट्रातील माझ्या तमाम बांधवभगिनींना आवाहन करतो की त्यांनी या महाराष्ट्रद्वेष्ट्यांपासून सावध रहा. हे एकतर देश संपवत आहेत.”
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* आम्ही हातानं स्वच्छ आहोत
मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र राज्यावर, महाराष्ट्र सरकारवर आणि ठाकरे कुटुंबीयांवर तोंडात शेण भरुन भरुन गोमुत्राच्या गुळण्या तुम्ही केल्या. मात्र, शेवटी काय झालं. आता हेच शेणानं भरलेलं आणि गोमुत्रानं भरलेलं तोडातलं गिळा आणि ढेकर देऊन गप्प बसा. कारण तुम्ही आमचं काही वाकडं करु शकत नाही. कारण आम्ही हातानं स्वच्छ आहोत. पापी वृत्तीचे नाहीत. स्वतः शेण खायचं आणि दुसऱ्याचं तोंड हुंगायचं अशी तुमची वृत्ती आहे. उद्धव ठाकरेंनी यावेळी हिंदुत्वापासून विरोधकांच्या राजकारणाबद्दल सर्व गोष्टींवर भाष्य केलं आहे.
* पंतप्रधानांनी चूक मान्य करावी
दसरा मेळाव्यातही केंद्राकडे थकीत असलेल्या जीएसटी भरपाईचा मुद्दा उपस्थित केला. त्याचबरोबर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना याविषयावर चर्चेसाठी समोर येण्याचं आवाहनही केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे एक मागणीही केली.
कर गोळा करण्याचा जो अधिकार आमच्याकडे होता. त्यावेळीही शिवसेना जीएसटीला विरोध करत होती. इथला पैसा दिल्लीत जाणार, मग दिल्ली सगळीकडे वाटणार. पैसा येत नाहीये. जीएसटी जर तुम्ही आम्हाला देऊ शकत नसाल, तर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मी या व्यासपीठावरून आवाहन करतोय की, पुढे या यावर चर्चा करूया. जीएसटीची जी काही कर पद्धत आहे, ती जर फसली असेल आणि मला वाटतं ती फसली आहे. आमच्या हक्काचा पैसा आम्हाला मिळाला पाहिजे. तो मिळत नाहीये. पत्रावर पत्र दिली जात आहेत. त्या पत्राला केराची टोपली दाखवली जाते. ते जर पैसे मिळत नसतील. ही जीएसटीची पद्धत जर फसलेली असेल, तर मला वाटतं पंतप्रधानांनी सुद्धा प्रामाणिकपणे चूक मान्य करून त्यात सुधारणा केली पाहिजे, नाही तर पुन्हा जुन्या करप्रणालीवर जाण्याची गरज असेल, तर तसं त्यांनी केलं पाहिजे,” अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
* दानवेजी बाप तुमचा असेल…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीकास्त्र डागलं. जीएसटीच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या धोरणांवरून निशाणा साधला. “दानवेजी बाप तुमचा असेल, माझा बाप इकडे आहे. माझ्यासोबत आहे. मला भाडोत्री बाप स्वीकारण्याची तयारी नाही. भाडोत्री बाप तुमचे तुम्हाला लखलाभ होवो. माझे मायबाप या मातीत आहेत, माझ्या विचारातून आणि कृतीतून वेळोवेळी त्याचे अस्तित्त्व तुम्हाला दिसून येईल, अशा शब्दात ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं. तुम्ही लग्न केलं आणि आता बापाकडे पैसे कशाला मागता? पण मला त्यांना हे सांगायचं आहे की, आमच्या लग्नात आलेला आहेर बापाने पळवून नेला. आहेराचे पैसे मोजून परत देतो, असे त्याने सांगितले. मात्र, अजूनही बाप पैसे मोजतच बसलाय, अशी खोचक टिप्पणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
* सरकार पाडण्यासाठी मुंबईत दोनशे कोटी पाठविले : राऊत
राज्यात मधल्या काळात सरकार पडणार असल्याच्या चर्चेनं डोकं वर काढलं होतं. त्यावरून बरंच राजकीय आरोप प्रत्यारोप झाले. विरोधी बाकांवरील भाजपाकडूनही सरकार पडणार असल्याचं म्हटलं जात होतं. या सगळ्यांचा समाचार घेत संजय राऊत यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं. दिल्लीतील चर्चेचा हवाला देत ठाकरे सरकार पाडण्यासाठी मुंबईतील भाजपा नेत्याकडे दोनशे कोटी रुपये पाठवण्यात आले होते,” असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावर केला.
नवीन नवीन तारखा देत असतात. मी दिल्लीला गेलो की, तिथे लोकं सांगत असतात की, भाजपाच्या अमुकतमुक नेत्याकडे दोनशे कोटी रुपये मुंबईत पोहोचले आहेत. सरकार पाडण्यासाठी. मी म्हणालो, दोनशे कोटी फारच कमी आकडा आहे मुंबईत. हे सरकार पाडण्यासाठी. तुम्ही आमची इज्जत कशा करीता काढता. तुम्ही असे दोन हजार कोटी, पाच हजार कोटी, जे तुम्हाला शोभतील ते आकडे तुम्ही सांगा. दोनशे कोटी वगैरे काय? हे तुमच्यासाठी नगरपालिकेचे आकडे आहेत. तारखा तुम्ही कितीही द्या. पैशाचा खेळ कितीही करा, पण या सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही.