सोलापूर : दसऱ्यापर्यंत राज्यातील सर्व मंदिरं भाविकांसाठी खुली करा, अन्यथा तीव्र आंदोलन करु, असा इशारा विश्व हिंदू परिषदेने राज्य सरकारला दिला आहे. या मागणीसाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी शनिवारी मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर आणि राज्यातील विविध भागांमध्ये आंदोलन केलं. मुंबईत मुंबादेवी परिसरात आंदोलन करण्यात आले. बार्शीत काल एसटीबस जाळण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बार्शीजवळच्या पानगाव शिवारात जय श्री रामच्या घोषणा देत राज्य परिवहन महामंडळाची बस अडवली आणि त्या बसवर मंदिरे खुली करण्याची मागणी करणारा फलक लावला. यावेळी विहिंपच्या कार्यकर्त्यांनी अधिक आक्रमक भूमिका घेत बसचे टायर जाळले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यामुळे प्रवाशांना एसटीच्या दुसऱ्या बसेसमधून बार्शी कडे रवाना करण्यात आले. यावेळी प्रवाशांसह परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विश्व हिंदू परिषदेचे विभागीय मंत्री सतीश आरगडे पाटील यांनी मात्र कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेचे समर्थन केले.
पुण्यात मंडईतील शारदा गणपती मंदिरासमोर शंख, ढोल यांचा नाद करत आंदोलन करण्यात आले. येत्या दसऱ्याला सरकारने जर मंदिरे उघडली नाहीत तर भविष्यात विश्व हिंदू परिषद तीव्र आंदोलन करेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
‘इतर राज्यातील मंदिरं खुली झाली. मात्र, महाराष्ट्रात अजूनही मंदिरं उघडली नाहीत. राज्यात दारुचे दुकानं सुरु झाले. पण मंदिरं उघडली नाहीत’, अशी टीका आंदोलकांकडून यावेळी करण्यात आली. ‘महाराष्ट्रातील मंदिरांच्या माध्यमातून हजारो लोकांच्या वर्षभराच्या रोजीरोटीची व्यवस्था होत असते. हे सगळे सरकारच्या निष्काळजीपणाने ठप्प झाले आहे. कोणत्याही निवडणुकीत सगळे छोटे-मोठे पुढारी देवळात दर्शन घेऊनच प्रचार करतात. त्यामुळे किमान आता तरी सरकारने समाजाचा आक्रोश लक्षात घ्यावा’, असे आंदोलक म्हणाले.
‘दसरा आणि दिवाळीचं महत्त्व हिंदू समाजासाठी मोठे आहे. दसरा-दिवाळीमध्ये देवाला साक्षी ठेवून नवीन वस्तूंची खरेदी हिंदू समाज करत असतो. अशा प्रसंगी देवालये उघडी नसतील, तर हिंदूंचे आर्थिक व्यवहारही कमी होतील. त्यामुळे भक्तांच्या दर्शनासाठी मंदिर उघडावी यासाठी आता विश्व हिंदू परिषदेने पुढाकार घेतला आहे’, अशी भूमिका आंदोलकांनी मांडली.