बुलढाणा : भरधाव स्कॉर्पिआच्या धडकेत रस्त्याच्याकडेला उभ्या असलेल्या बाप-लेकासह एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रात्रीच्या सुमारास शेगाव-खामगाव रोडवरील माऊली कॉलेजजवळ हा अपघात झाला आहे. तिघेजण रस्त्याच्याकडेला उभे असताना एका भरधाव स्कॉर्पिओने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की तिघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. स्थानिकांना अपघाताची माहिती मिळताच तात्काळ पोलिसांना पाचारण करण्यात आलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील उर्फ लखन मरिभान बावणे (वय 30) आणि त्याचे वडील मरिभान हिरामन बावणे (वय 50) आणि शेख रज्जाक शेख रहेमान (वय 40) अशी अपघातातील मृतांची नावं आहेत. हे तिघेही फैल शेगाव इथं राहणारे आहेत. रात्रीच्या सुमारास एका कामानिमित्त ते माऊली कॉलेजजवळ दुचाकी उभी करून रस्त्याच्याकडेला उभे होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तेवढ्यात शेगावहून खामगावकडे जाणाऱ्या स्कॉर्पिआने त्यांना धडक दिली. यामध्ये स्वप्नील बावणे आणि मरिभान बावणे हे दोघे बाप-लेक जागीच ठार झाले. तर शेख रज्जाक शेख रहेमान गंभीर जखमी झाला होता. त्याला अकोला येथे उपचारासाठी घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शेगाव पोलिसांनी स्कॉर्पिआ चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून तिघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून ते शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर एकाच वेळी गावातील तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.