मुंबई : एका फोटोची महाराष्ट्रात सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. अनेकजण या फोटोची तुलना शरद पवार यांच्या साताऱ्यातील ऐतिहासिक सभेशी केली जात आहे. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. यात डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी जो बायडेन यांनी शरद पवारांसारखे पावसात भिजून धुराळाच उडवला आहे. याची महाराष्ट्रासह देशभरात चर्चा होत आहे.
अमेरिकेतील निवडणुकीसाठी 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 4 नोव्हेंबरला अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष निवडला जाईल. त्यामुळे अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षातील त्यांचे प्रतिस्पर्धी जो बायडेन प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात संपूर्ण ताकद पणाला लावताना दिसत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडेन या दोन्ही नेत्यांनी नुकत्याच फ्लोरिडात सभा घेतल्या. यापैकी जो बायडेन यांची सभा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
फ्लोरिडात जो बायडन यांचे भाषण सुरु असताना पावसाला सुरूवात झाली. परंतु त्यांनी आपलं भाषण न थांबवता ते सुरूच ठेवले. या सभेनंतर जो बायडेन यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला. ‘वादळ संपेल आणि नवीन दिवसाची सुरुवात होईल’, अशी कॅप्शन जो बायडेन यांनी फोटोखाली लिहली आहे. मात्र, पावसाचा जोर वाढल्यानंतर जो बायडेन यांना आपले भाषण आवरते घ्यावे लागले.
गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीवेळी शरद पवार यांनीही प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यातच साताऱ्यात सभा घेऊन संपूर्ण वातावरण बदलून टाकले होते. शरद पवार यांचे भाषण सुरु असताना अचानक पाऊस सुरु झाला. मात्र, शरद पवार यांनी पावसात न थांबता, न थकता, पावसाच्या धारा परतवून लावत पवारांशी उपस्थितांशी संवाद साधला होता. शरद पवार यांच्या या जिद्दीचे तेव्हा प्रचंड कौतुक झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीत याचा चांगलाच फायदा झाला होता.