कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी अतिरिक्त 64 एकर जागा संपादित केली जाणार आहे. या भूसंपादनासाठी राज्य शासनाने दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. यामुळे भूसंपादन प्रक्रियेला वेग येणार आहे. या भूसंपादनामुळे धावपट्टीचे विस्तारीकरण 2,300 मीटरपर्यंत होणार आहे.
कोल्हापूर विमानतळाचे विस्तारीकरण सुरू आहे. या विस्तारीकरणात पश्चिम बाजूला असलेले केआयटी कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल व उच्चदाब वाहिन्यांचे अडथळे दूर करणे शक्य नाही. त्यामुळे विमानतळाच्या पूर्वेकडील अतिरिक्त 64 एकर जमीन संपादन करण्याचा निर्णय झाला.
ही जमीन संपादित करून ती तातडीने भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात येणार आहे. या अतिरिक्त जागेच्या संपादनाचा प्रस्ताव राज्य शासनाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या ‘हाय पॉवर कमिटी’समोर ठेवण्यात आला होता. त्याला या कमिटीने 4 मार्च 2020 रोजी मान्यता दिली. यानंतर राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने 11 मार्च 2020 रोजी 26 कोटींच्या निधीला वित्तीय व प्रशासकीय मान्यता दिली.
भूसंपादनासाठी आवश्यक असलेला 26 कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी देसाई यांनी केली होती. या मागणीचे पत्र 25 सप्टेंबर रोजी राज्य शासनाला पाठवले होते. या जागेच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला ‘संपादन मंडळ’ म्हणून घोषित करण्यात आले असून, जिल्हाधिकार्यांमार्फत हे संपादनाचे काम केले जाणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* कोल्हापूर विमानतळावर होणारी कामे
उपलब्ध होणार्या दहा कोटींच्या निधीच्या विनियोगाबाबत जिल्हा प्रशासन निर्णय घेणार असून, त्यानुसार तातडीने कार्यवाही सुरू केली जाणार आहे. सध्या कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण सुरू आहे. सध्याच्या धावपट्टीच्या दोन्ही बाजूला (पूर्व आणि पश्चिम) विस्तारीकरण केले जाणार होते. मात्र, पश्चिमेकडील अडथळ्यामुळे ही धावपट्टी पूर्व दिशेलाच विस्तारणार आहे. सध्या 560 मीटरपर्यंत धावपट्टीचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. त्यावर एअर बससारखी विमाने उतरवता येणार नाहीत. अतिरिक्त भूसंपादन झाल्यानंतरच ही धावपट्टी 2,300 मीटरपर्यंत वाढणार असून, त्यानंतरच बोईंग, एअर बससारखी मोठी विमानेही उतरणार आहेत. यामुळे भूसंपादन प्रक्रिया लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी उर्वरित निधीही लवकर उपलब्ध झाल्यास पुढच्या वर्षात हे काम पूर्ण होईल, अशी शक्यता आहे.
* राज्यातील विमानतळांसाठी 78 कोटींची तरतूद
राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी राज्य शासनाने 78 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. त्यानुसार यापूर्वी दहा टक्के म्हणजे 7 कोटी 80 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यातील 7 कोटी 50 लाख रुपये शिर्डी विमानतळाला देण्यात आले आहेत. आज कोल्हापूर विमानतळासाठी दहा कोटींचा निधी महाराष्ट्र विमानतळ कंपनीकडे राज्य शासनाने वितरित करण्यास मान्यता दिली. याबाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाने आज काढला आहे. यामुळे भूसंपादनासाठी दहा कोटींचा निधी उपलब्ध झाला असून, उर्वरित 16 कोटी निधीही लवकर उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करण्याची गरज आहे.