पाटणा : बिहारच्या मुंगेर शहरात पुन्हा हिंसाचार भडकला. संतप्त जमावाने वासुदेवपूर पोलिस चौकीला आग लावली. पोलिस अधिक्षकाच्या घरावरही हल्ला झाला. यात पोलिसांच्या सहा गाड्यांचे नुकसान झाले. निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांची तातडीने बदली केली.
दरम्यान, २६ ऑक्टोबर रोजी दुर्गा मूर्ती विसर्जन मिरवणुकीवेळी दंगली दरम्यान पोलिसांना जमावाला आवरताना गोळीबार करावा लागला होता. यावेळी जमावावर लाठीहल्ला देखील करण्यात आला होता. या घटनेचा व्हिडिओ २८ ऑक्टोबर रोजी व्हायरल झाल्यानंतर या भागामध्ये पुन्हा हिंसाचार भडकला होता. पोलिस अधिक्षक लिपी सिंह यांच्यावर आंदोलकांचा राग आहे.
दुर्गादेवी विसर्जनाच्या दिवशी झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी शेकडो तरुण रस्त्यावर उतरले आणि हे आंदोलन पोलिस अधीक्षक कार्यालयाजवळ तसेच एसडीओ निवास स्थानाजवळ पोहोचले.
त्या ठिकाणी पोहोचताच त्यांनी तोडफोड केली. तसेच त्यांनी अनेक गाड्यांनाही पेटवून दिल्या, लोकांनी पोलिस स्टेशनवर देखील दगडफेक केली. या सगळ्या प्रकरणानंतर घटने ठिकाणी अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आली आहे. अशी माहिती तेथील स्थानिक मिडियानं दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुंगेर जिल्ह्याच्या दीन दयाल उपाध्याय या चौकाजवळ सोमवारी रात्री गोळीबार झाला होता. या सर्व घटनेत २० वर्षीय एका तरुणाचा मृत्यू झाला आणि २५ पेक्षाही अधिक जण जखमी झाले होते. गर्दीमध्ये कोणीतरी केलेल्या गोळीबारात या २० वर्षीय तरुणाचा मृत्यु झाल्याची बातमी जिल्हाअधिकारी राजेश मीणा यांनी दिली होती. तर दुसरीकडे, लिपी सिंह यांनी निशस्त्र लोकांवर गोळ्या आणि काठी चालवण्याचा आदेश दिल्याचा आरोप लोकांकडून केला जातोय. तर मुंगेरचे जिल्हा दंडाधिकारी राजेश मीणा यांनी ह्याला प्रतीउत्तर देत सांगतले आहे की, काही असामाजिक व्यक्तींकडून हा मोठा कट रचला गेला होता.
* जालियनवाला बाग हत्याकांडशी तुलना
मुंगेरच्या एसपी लिपी सिंह यांची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडमधील जनरल डायर सोबत केली जात आहे. लिपी सिंह यांच्यावर क्रूर अधिकारी अशी टीका देखील केली जात आहे. या सर्वात राजकारणाचा समावेश असल्याची शक्यता आहे, कारण लिपी सिंह या नितीश यांच्या जवळच्या मानल्या जाणार्या माजी आयएएस अधिकारी आणि जेडीयूचे राज्यसभा सदस्य आरसीपी सिंह यांची मुलगी आहे. त्यामुळे या घटनेवर विरोधक नितीश कुमार यांनी विशेष लक्ष्य दिलं आहे.
* हेलिकॉप्टरने अधिकारी रवाना
येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस महासंचालक मनू महाराज यांना आज पोलिस दलासह मैदानात उतरावे लागले. आता पोलिस अधिक्षक म्हणून मानवजितसिंग धिल्लाँ आणि जिल्हा न्यायदंडाधिकारी म्हणून रचना पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे दोन्ही अधिकारी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मुंगेरला पोचले. जिल्हाधिकारी हे सध्या निवडणूक अधिकाऱ्याच्या भूमिकेत असल्याने ते हेलिकॉप्टरच्या माध्यमातून येथे आले. या हिंसाचारामुळे मुंगेरनजीकच्या भागामध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.