श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील कुलगाममध्ये गुरुवारी दहशतवाद्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या तीन नेत्यांची गोळ्या घालून हत्या केली आहे. कुलगाममधील वायके पोरा इथं दहशतवाद्यांनी फिदा हुसैन इट्टू, उमेर राशिद बेग आणि उमेर हनान यांच्यावर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यामध्ये तिघांचाही मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी तिघांनाही जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं.
जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये एका गावात अतिरेक्यांनी भाजपच्या तीन कार्यकर्त्यांची हत्या केली आहे. स्थानिक पोलिसांनी ही माहिती दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अतिरेक्यांनी भाजपच्या तीन कार्यकर्त्यांवर गोळ्या झाडल्या. हल्ल्यानंतर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.
काश्मीरमधील भाजप नेत्यांना सतत दहशतवाद्यांकडून लक्ष्य केले जात आहे. मागील ६ महिन्यांच्या कालावधीत काश्मिर खोऱ्यात दहशतवाद्यांनी तब्बल भाजपच्या १४ नेत्यांना ठार मारले आहे.
यात दोन दहशतवादी घटना अशा आहेत ज्यामध्ये दहशतवाद्यांनी तीन नेत्यांना ठार केले आहे. वसीम बारी आणि त्यांच्या वडिलांसह भावाच्या हत्येनंतर काश्मीरमध्ये भाजप नेते भयभित आहेत. गेल्या सहा महिन्यात झालेल्या काश्मिरमधील हत्याकांडात सर्वाधित हत्या या ऑगस्टमध्ये झाल्या आहेत. काश्मीरमध्ये ऑगस्टमध्ये सरपंचांसह पाच नेत्यांचा हत्या झाली आहे.
* भाजपाकडून हल्ल्याचा निषेध
जम्मू काश्मीर भाजपने या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. फिदा हुसैन इट्टू भारतीय जनता युवा मोर्चाचे कुलगाम जिल्हा महासचिव होते. उमेर राशिद बेग हे कुलगाम जिल्ह्यातील भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य होते तर उमेर हनान हे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस होते. या हल्ल्यानंतर पक्षानं म्हटलं आहे की, या हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही. जम्मू-काश्मीर भाजपाने एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘हे कृत्य दहशतवाद्यांच्या निकृष्ट प्रतिबिंब आहे. देव दिवंगत लोकांना शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्यास सामर्थ्य देवो. आम्ही त्यांच्या कुटुंबियांसोबत आहोत.
* टीआरएफ या नवीन दहशतवादी संघटना
मागिल ६ महिन्यांच्या कालावधीत काश्मिर खोऱ्यात दहशतवाद्यांनी तब्बल भाजपच्या १४ नेत्यांना ठार मारले आहे. याची जबाबदारी टीआरएफ या नवीन दहशतवादी संघटनेने घेतली आहे. दरम्यान, या हत्येत जे दहशतवादी सहभागी होते त्यांना सुरक्षा दलांनी कारवाईत ठार केले आहे. सुरक्षा दलांनी चोख कारवाई करूनही काश्मिर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून होणाऱ्या भापज नेत्याच्या हत्या काही थांबण्याचे नाव घेत नाहीत.
गुरूवारी झालेल्या हत्याकाडांने काश्मीर खोऱ्यात भापज नेते भितीच्या छायेत आहेत. पोलिसांनी वारंवार सुरक्षा वाढवल्याचा दावा केला पण त्याने काही फरक पडलेला नाही. गुरूवारी कुलगाममध्ये झालेल्या तीन भाजप नेत्यांच्या हत्येची जबाबदारी टीआरएफ या नवीन दहशतवादी संघटनेने घेतली आहे. काश्मीरमध्ये या संघटनेचे इतके नाव मोठे नाही. परंतु तरीही दहशतवादी संघटनेने इतकी मोठी घटना घडवून आणण्यास कसे यश मिळवले, याचे मंथन सुरक्षा यंत्रणा करीत आहे.
* सहा महिन्यात १४ जणांची हत्या
४ मे रोजी अनंतनागमध्ये अटल गुल मीरची हत्या.
३० जून रोजी शोपियांमध्ये भाजप नेते गौहर बट यांची हत्या.
५ जुलैला शब्बीर बटची पुलवामा येथे हत्या झाली.
८ जुलै रोजी वसीम बारीच्या वडिलांना आणि भावाला ठार मारले गेले.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात कुलगाममध्ये सरपंच आरिफ अहमद शाह याची हत्या करण्यात आली.
७ ऑगस्ट रोजी काझिकुंडमध्ये सरपंच सज्जाद अहमद यांची हत्या.
१० ऑगस्ट रोजी बडगाममध्ये हमीद नाझरची हत्या
१९ ऑगस्ट रोजी सरपंचचे अपहरण करून खून करण्यात आला, २८ ऑगस्ट रोजी शोपियांमध्ये मृतदेह सापडला.
७ ऑक्टोबर रोजी गंदरबल येथील भाजप नेत्याच्या घरावर दहशतवादी हल्ला, नेता वाचला पण पीएसओ शहीद झाला.
२९ ऑक्टोबरला कुलगाममध्ये भाजपचे तीन नेते मारले गेले.