मुंबई : आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले. विदर्भ, मराठवाड्यातील वैधानिक विकास महामंडळाच्या मुद्द्यावरून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी पाहायला मिळाली. राज्यपालांनी 12 सदस्यांची नियुक्ती करताच महामंडळे स्थापन करू, असं पवारांनी सांगितलं. तेव्हा फडणवीसांनी त्याला विरोध केला. ‘दादांच्या पोटातले ओठांवर आले. हा विदर्भ-मराठवाड्यातील जनतेला ओलीस ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे,’ फडणवीस म्हणाले.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सोमवारपासून मुंबईत सुरु झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. वैधानिक विकास महामंडळाच्या पुनर्स्थापनेचा विषय विधिमंडळात गाजला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वैधानिक विकास महामंडळारुन सरकारला घेरले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही? सरकार यावर निर्णय का घेत नाही? असे प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केले. त्यावर अजित पवारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून सुरु असलेल्या सरकारच्या आडवणुकीकडे लक्ष वेधले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विकास महामंडळ आम्ही स्थापन करु. बजेटमध्ये मी तसा निधी देईन. ज्या दिवशी राज्यपाल १२ आमदारांची नावे जाहीर करतील, त्या दिवशी आम्ही वैधानिक विकास मंडळ घोषित करु असे पवार म्हणाले.
अजित पवार यांनी १२ आमदारांचा विषय उपस्थित करताच देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला. दादांच्या पोटातले आता ओठांवर आले. १२ आमदारांसाठी मराठवाडा, विदर्भातल्या कोट्यवधी लोकांना ओलीस ठेवले आहे का? असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. आम्ही जे मागत आहोत, ते आमच्या हक्काचे आहे. तुम्ही आम्हाला भीक देत नाही. तुम्ही देणार नसाल, तर आम्ही भांडून मिळवू, अशा शब्दांत फडणवीस यांनी पवारांना उत्तर दिले. आमचे म्हणणे एेकले जात नसेल तर आम्ही एक मिनिट सभागृहात बसणार नाही. कामकाज रेटून न्यायचे असेल तर आम्हाला बसवता कशाला, अशा शब्दांत फडणवीसांनी हल्लाबोल केला.
* १० नंबरी काय आणि पुढचा कोणता नंबर लावा, तसं अधिवेशन करु
“विकास महामंडळ आम्ही स्थापन करु, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. बजेटमध्ये तसा निधी देऊ. आमचं लवकरात लवकर करायचं ठरलं आहे. पण मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतला आहे, ज्या दिवशी १२ आमदारांची नावं जाहीर करतील त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी आम्ही वैधानिक विकास मंडळ घोषित करु. १० नंबरी काय आणि पुढचा कोणता नंबर लावा तसं अधिवेशन करु,” असं उत्तर अजित पवार यांनी यावेळी दिलं. अजित पवार बोलत असताना विरोधक गदारोळ घालू लागल्यानंतर तुमचं ऐकलं आता माझं ऐकून घ्या म्हणत अजित पवारांनी सुनावलं.