मुंबई : पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा निषेध करण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांनी मुंबईत सायकल मोर्चा काढला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चात काँग्रेसचे मंत्री व आमदारांचा सहभाग होता. दरम्यान काँग्रेस आमदारांची सायकल रॅली विधानभवनाजवळ पोहचताच काँग्रेस आणि भाजप आमदारांत घोषणाबाजी झाली.
इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेसच्या आमदारांनी अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी सायकल मोर्चा काढला. मंत्रालयासमोरील महात्मा गांधी यांच्या पुतळयाला अभिवादन करुन सायकलवरुन विधानभवनाकडे निघाले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. यामध्ये पालकमंत्री सतेज पाटील, भाई जगताप आदींचा समावेश होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विविध जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदारही सायकल मोर्चात सहभागी झाले. इंधन दरवाढीवरुन प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला. पटोले म्हणाले, ‘ मोदी सरकारच्या कालावधीत महागाईचा विक्रम झाला आहे. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणं अवघड बनले आहे. केंद्रातील मोदी सरकार लोकांच्या तोंडातील घास हिरावून घेत आहे. काँग्रेसतर्फे महागाईविरोधात देशभर आंदोलन सुरू आहे.’
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने विधिमंडळ परिसरात आज सायकल आंदोलन केलं. यावेळी मोदी सरकारविरोधात घोषणा दिल्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, की ‘केंद्र सरकार सामान्यांची थट्टा करत आहे. मोदी सरकार सामान्यांना लुटण्याचं काम करत आहे. सर्वसामान्यांच्या तोंडातला घास मोदी सरकार काढून घेत आहे. केंद्राने पेट्रोल, डिझेल दरवाढीची श्वेतपत्रिका जाहीर करावी.’
या रॅलीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय घणाघाती टीका केली आहे.राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, “राज्य सरकारने पेट्रोलवर २७ रुपये टॅक्स लावला आहे. नाना पटोलेंचं आंदोलन हे राज्य सरकारच्या टॅक्सविरोधातच असावं. गुजरात किंवा इतर राज्यांमध्ये १० रुपयांनी पेट्रोल दर कमी करण्यात आले आहेत, तशाच प्रकारे महाराष्ट्रात देखील दर कमी करावेत, यासाठीच त्यांनी हे आंदोलन केलं असावं.” तसेच त्यांनी नाना पटोलेंच्या आंदोलनाला काँग्रेसचा मीडिया इव्हेंट असं म्हणून टोला लगावला आहे.
* फडणवीसांची आंदोलानावर टीका
अजित पवार अर्थसंकल्प मांडताना पेट्रोलवरचे राज्य सरकारचे काही टॅक्स कमी करून दर कमी करणार आहेत असं वाटतंय. त्यामुळे श्रेय घेण्यासाठी काँग्रेसकडून आधीच हा सायकल मोर्चा काढण्यात आला. पण राज्यात विरोधी पक्षाची जागा काँग्रेसला घेता येणार नाही. काँग्रेसचं देशातही विरोधी पक्ष म्हणून स्थान नाही. एकूणच काँग्रेसची अवस्था केविलवाणी आहे. या अवस्थेत त्यांना मीडिया इव्हेंट करावा लागणारच. तो ते करत आहेत”, अशी घणाघाती टीका फडणवीसांनी केली आहे.