मुंबई : आपण पुरोगामी महाराष्ट्र असे राज्याला म्हणवतो आणि या राज्यातील नेत्यांकडून पुढच्या पिढीसाठी जी उदाहरणे प्रस्थापित केली जात आहेत ती दुर्दैवी असून सरकार, युती टीकवण्यासाठी फक्त आणि फक्त चुकीच्या गोष्टींना पाठीशी घातले जात आहे, असा नाराजीचा सूर आळवत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी मुंबईत एका पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली.
“ज्या प्रकारे फक्त सरकार टिकवण्यासाठी किंवा आघाडी टिकवण्यासाठी चुकीच्या गोष्टींना पाठिशी घातलं जातंय, ते चुकीचं असून मी त्याचा निषेध करते”, अशा शब्दांत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारवर आणि अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो. सध्या ज्या प्रकारची उदाहरणं प्रस्थापित केली जात आहेत ती पुढच्या राजकारण्यांसाठी प्रस्थापित होत आहेत. ही दुर्दैवी बाब आहे” असं पंकजा मुंडे म्हणाल्या. तसेच, संजय राठोड यांच्याप्रमाणेच धनंजय मुंडेंनी देखील राजीनामा द्यायला हवा, या मागणीचा देखील त्यांनी पुनरुच्चार केला. काल सोमवारी घेतलेल्या जाहीर पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, यावेळी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची तपास यंत्रणांनी निष्पक्षपणे चौकशी करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली. “मुख्य पीडिता बाजूला राहून वेगळंच राजकारण उभं केलं जात आहे. संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. तो दिला की घेतला हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. राजीनामा तर दिला, पण आता चौकशीचा मुद्दा आहे. राजीनामा ही चांगलीच गोष्ट झाली. आता यंत्रणांनी नि:पक्षपातीपणे त्या प्रकरणाचा तपास करावा. तसा तो होईल, याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी”, असं मुंडे म्हणाल्या.
संजय राठोड आणि धनंजय मुंडे यांच्याविषयी बोलताना पंकजा मुंडेंनी एका वेगळ्या तपास यंत्रणेची आवश्यकता व्यक्त केली. “राजकारणात जे लोकं वावरत आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल असतील, तर त्याची चौकशी करण्यासाठी आता वेगळी यंत्रणाच लागेल असं दिसतंय”, असं त्या म्हणाल्या.