मुंबई : ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मोघे यांचे पुण्यात राहत्या घरी निधन झाले. त्यांनी वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. मोघे यांनी साठहून अधिक नाटकांत आणि पन्नासहून अधिक चित्रपटांत काम केलं आहे. एकेकाळी मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रांत ‘चॉकलेट हिरो’ अशी प्रतिमा असलेले नायक म्हणून श्रीकांत मोघे यांच्याकडे पाहिलं जायचं. रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अर्धशतकाहून अधिक काळ आपल्या सहजसुंदर अभिनयाचा ठसा उमटवला होता.
मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा अभिनेता शंतनु मोघे आणि सून अभिनेत्री प्रिया मराठे असा परिवार आहे. श्रीकांत मोघे यांचा जन्म 6 नोव्हेंबर 1929 रोजी झाला. त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण किर्लोस्कर वाडी येथे तर पुढील शिक्षण सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात झालं.
शालेय जीवनातच ते नाटकांकडे वळले. श्रीकांत मोघे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण किर्लोस्करवाडी येथे आणि इंटरपर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत विलिंग्डन कॉलेजात झाले. बीएस्सीसाठी ते पुण्याच्या स.प.कॉलेजात आले. मुंबईला जाऊन त्यांनी बी.आर्च. ही पदवी घेतली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शाळेत असतानाच ते नाट्यअभिनयाकडे वळले. महाविद्यालयात शिकत असताना भालबा केळकर यांच्या ‘बिचारा डायरेक्टर’ या नाटकाचे दिग्दर्शनही श्रीकांत मोघे यांनी केले होते. त्यांनी कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये ‘घराबाहेर’ तसेच आचार्य अत्रे यांच्या ‘लग्नाची बेडी’ या नाटकांचे प्रयोग केले.
आपल्या नाट्यप्रवासावर त्यांनी नाट्यरंगी रंगलो हे आत्मचरित्र लिहिलं आहे.
वसंत कानेटकर यांच्या ‘लेकुरे उदंड जाली’ नाटकामधील राजशेखर ऊर्फ राजा ही आणि पु. ल. देशपांडे यांच्या ‘वाऱ्यावरची वरात’मधील बोरटाके गुरुजी या त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या.
* मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
– महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार (२००५-०६)
– काशीनाथ घाणेकर पुरस्कार (२०१०)
– केशवराव दाते पुरस्कार (२०१०)
अखिल भारतीय मराठी
– नाट्यपरिषदेचा पुरस्कार (२०१०)
– सांगली येथे झालेल्या ९२व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद (२०१२)
गदिमा पुरस्कार (२०१३)
– महाराष्ट्र सरकारचा २०१४ चा प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार
– महाराष्ट्र शासनाचा कलागौरव पुरस्कार