नवी दिल्ली : भारताने इंग्लंडवर चौथ्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवला आहे. इंग्लंडचा दुसरा डाव आज 135 धावांवर आटोपला. तसेच भारताचा एक डाव आणि 25 धावांनी विजय झाला. भारताकडून आर. अश्विन आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 5 विकेट्स घेतल्या. त्याआधी भारताने पहिल्या डावात 365 धावा केल्या होत्या. भारताने ही मालिका 3-1 ने जिंकली आहे. दरम्यान या विजयामुळे भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे.
भारतीय संघाने चौथा आणि अखेरचा कसोटी सामना 25 धावा आणि एक डाव राखून जिंकला आहे. तिसऱ्या दिवशीच सामना संपवत टीम इंडियाने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. पहिल्या डावात 205 धावांत आटोपलेला इंग्लंडचा संघ दुसऱ्या डावात अवघ्या 135 धावांत आटोपला. अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांनी दुसऱ्या डावात प्रत्येकी 5-5 विकेट घेतल्या.
पंतचे शतक आणि वॉशिंग्टन सुंदरने अक्षर पटेलच्या साथीनं केलेली 165 धावांची भागीदारी याच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात 365 धावांपर्यंत मजल मारली होती. 6 बाद 146 अशा संकटातून पंत-वॉशिंग्टन जोडीने भारताचा डाव सावरला. दुसऱ्या दिवसाअखेर भारताने पंतची विकेट गमावून 7 बाद 294 धावा केल्या होत्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेलने तिसऱ्या दिवशी 7 बाद 294 धावांवरुन भारतीय संघाच्या डावाला सुरुवात केली. वॉशिंग्टन सुंदर 96 धावांवर खेळत असताना अक्षर पटेलच्या रुपात टीम इंडियाला आठवा धक्का बसला. अक्षर पटेल 43 धावांवर रन आउट झाला. त्यानंतर बेन स्टोक्सने ईशांत शर्मा आणि मोहम्मद सिराजला एकाच षटकात शून्यावर माघारी धाडत भारतीय संघाचा डाव 365 धावांत आटोपला.
भारतीय संघाने घेतलेल्या आघाडीही इंग्लिश फलंदाजांना भेदता आली नाही. लॉरेन्स (50), कर्णधार ज्यो रुट (30), ओली पोप (15) आणि बेन फोक्स (13) यांच्याशिवाय अन्य कोणत्याही इंग्लिश फलंदाजाला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. परिणामी इंग्लंडचा दुसरा डाव 135 धावांत आटोपला.
* कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत पहिल्या स्थानी
भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका 3-1 ने जिंकली. या विजयासह भारताने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत पहिला क्रमांक पटकावला आहे. भारताने 72.2 टक्क्यांसह पहिला क्रमांक मिळवला. तर न्यूझीलंडचा संघ 70.0 अशा विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या आणि इंग्लंडचा चौथ्या स्थानावर आहे.