मुंबई : महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज जागतिक महिला दिनी विधानसभेत सादर केला. महाविकास आघाडीचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. विधानसभेत दुपारी दोन वाजता अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. यावेळी राज्यातील महिलांना मोठं गिफ्ट दिलं आहे.
राज्यात राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील कोणतेही कुटुंब घर विकत घेईल तेव्हा घरातील महिलेच्या नावानं घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात (स्टॅम्प ड्युटी) एका टक्क्याची सूट दिली जाणार आहे. या योजनेची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार असून याची अंमलबजावणी १ एप्रिल २०२१ पासून करण्यात येणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे.
योजनेअंतर्गत कुटुंबातील महिलेच्या नावानं घर विकत घेतलं जाणार असेल तर मुद्रांक शुल्कात एका टक्क्याची सूट देण्यात येईल आणि याबाबतची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल, असं अजित पवार म्हणाले. कुटुंबातील महिलेच्या नावानं घर विकत घेतलं जाणार असेल तरच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचंही यावेळी पवारांनी सांगितलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्याचे अर्थराज्यमंत्री शंभुराजे देसाई विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर केला. राज्यातील ३१ लाख २३ हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळाला, असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. तसेच ३ लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के दराने मिळणार असल्याचे सांगितले.
कृषी क्षेत्राने राज्याच्या अर्थव्यवस्थेला सावरले, असे नमूद करत राज्यात २७८ सिंचन प्रकल्पाची कामे सुरू आहेत. तसेच बळीराजा जलसिंचन प्रकल्पाअंतर्गत ९१ प्रकल्पांची कामे सुरू असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली. शेतकरी बांधवांना ३ लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के दराने दिले जाईल. यंदा ४२ हजार कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. बाजार समित्यांच्या बळकटीसाठी २ हजार कोटी रुपयांची योजना राबवणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
* विद्यार्थिनींना मोफत बस प्रवास
राज्यातील सर्व ग्रामीण तालुक्यातील विद्यार्थिनींना शाळा आणि महाविद्यालयात जाण्यासाठी मोफत प्रवास करता यावा यासाठी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले योजना सुरु करण्यात येत असून याअंतर्गत बारावीपर्यंतच्या विद्यार्थिंनीना मोफत बस प्रवास करता येईल, असं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. शाळकरी मुलींच्या प्रवासासाठी १५०० पर्यावरणपूरक हायब्रीड बसेस उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.
* अमरावतीमध्ये संत्रा संशोधन केंद्र
राज्य सरकारने सुलभ पद्धतीने महात्मा फुले कर्जमाफी योजना राबवण्यात आली. याचा ३१ लाख २३ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला. विकेल ते पिकेल योजनेसाठी २१०० कोटी किमतीचा बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय प्रकल्प राबवला जात आहे. प्रत्येक तालुक्यात अहिल्याबाई होळकर रोपवाटिका योजना सुरु करण्यात येईल. तर, विदर्भातील अमतरावतीमध्ये संत्रा संशोधन केंद्र सुरू करणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.
* नाशिक जिल्ह्यात अन्नप्रक्रिया उद्योग उभारणार
संत्र उत्पादकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी नाशिक जिल्ह्यात अन्नप्रक्रिया उद्योग उभारणार असल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांना संशोधनासाठी २०० कोटी रुपये दिले जाणार असून, कृषी पंप जोडणी धोरण राबवून त्यासाठी महावितरणाला १५०० कोटी रुपये दिले जातील, असे अजित पवार म्हणाले.
* चार जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये
आरोग्य विभागासाठी ७ हजार २०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती अजित पवार यांनी विधानसभेत दिली. सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड, सातारा येथे वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यात येतील. यावेळी अजित पवार यांनी सर्व कोविड योद्धांचे आभार मानले. महिलांसाठी विशेष योजना सुरू करण्याचा मानस आहे. महाराष्ट्र कधीही संकटापुढे झुकला नाही. सध्या कोरोनाचं संकट आहे. आपल्या सर्वांसमोर अनेक आव्हानं असल्याचं ते म्हणाले. कोरोनाच्या संकटात आरोग्य सेवांसाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे. सरकारकडून आरोग्य विभागासाठी ७ हजार २०० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.