मुंबई : विधानसभेत आज मोठा गदारोळ झाला. खासदार मोहन डेलकर आत्महत्येप्रकरणी चौकशीची घोषणा ठाकरे सरकारने केली. दुसरीकडे विरोधकांनी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून आवाज उठवला. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. या गाडीचा मालक असलेल्या मनसुख यांचा मृतदेह गेल्या आठवड्यात आढळून आला. या प्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबित करावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली.
विधानसभा विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरुन एन्काऊंटर स्पेशलिस्ट सचिन वझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. फडणवीस यांनी विधानसभेत खळबळजनक दावा केला आहे. मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे यांनी केल्याचा संशय फडणवीस यांनी केला आहे.
मनसुख हिरेन हत्याप्रकरणात आज मंगळवारी विधानसभेत मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी फडणवीसांनी सभागृहात मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेनच्या यांच्या तक्रारीचा अर्ज वाचून दाखवला. या तक्रारीत म्हटलं आहे की, मनसुख हिरेन यांची गाडीतच हत्या करण्यात आली. त्यानंतर त्यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत फेकून दिला आहे. खाडीत भरती येण्याची वेळ असल्यानं मनसुख हिरेन यांचा मृतदेह किनाऱ्यावर येणार नाही, असे मारेकऱ्यांना वाटले. मात्र, नेमक्या त्याच दिवशी मारेकऱ्यांच्या दुर्दैवाने खाडीत भरती आली नाही आणि शव किनाऱ्यावर आला असल्याचंही फडणवीस यांनी म्हटले.
फडणवीस पुढे म्हणाले की, हिरेन यांच्या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. त्यासोबत त्यांच्या पत्नीचा जबाब महत्वाचा आहे. वाझे माझ्या पतीचे ओळखीचे होते. नोव्हेंबर 2020 मध्ये सदर कार वापरली होती. 4 महिने कार वाझे यांच्याकडे होती. 26 फेब्रुवारी 2021ला वाझे सोबत माझे पती मुंबई गुन्हे शाखेत गेले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हिरेन यांची चौकशी फक्त वाझे यांनी केली आणि वाझे यांच्या सांगण्यावरून तक्रार दाखल केली होती. चौकशी झाल्यानंतरही जो तक्रार अर्ज देण्यात आला तोही वाझे यांच्या सांगण्यावरून दिला होता. वाझे यांनी माझ्या पतीला अटक करुन घ्यायला सांगितले होते, मग दोन तीन दिवसात बाहेर काढू असं सांगितले, असा खुलासा फडणवीस यांनी सभागृहात केला आहे. तसंच वाझे यांनी स्फोटकांनी भरलेल्या अवस्थेत सापडलेली कार वापरण्यासाठी नेली होती, असा आरोपी हिरेन यांच्या पत्नीनं केला आहे.
15 दिवसांपासून गाडीचे स्टेअरिंग हार्ड होते. सचिन वाझेकडून या केसमध्ये अटक होण्यासाठी दबाव होत होता. अटकेनंतर जामीनावर बाहेर काढण्याचंही आश्वासन वाझेंनी दिलं होतं. अटक होण्याची चिंता हिरेन यांनी घरातल्यांजवळ बोलून दाखवली होती. हिरेन शेवटपर्यंत वाझेंच्या संपर्कात होते. वाझेंनी हत्या केल्याचा आरोप हिरेन यांच्या कुटुंबियांनी केला आहे, असंही फडणवीस म्हणालेत.