मुंबई : महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांना गाण्याचा छंद आहे. आपली नोकरी सांभाळत त्यांनी आपली गाण्याची आवड जोपासली आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक गाणी गायली आहेत. कधी याच गाण्यांमुळे ट्रोल झालेल्या अमृता फडणवीसांना रोहित पवारांनी कौतुकाची दाद दिली आहे.
जागतीक महिला दिनानिमीत्त अमृता फडणवीस यांनी नाट्यसंगीतावर आधारीत नवीन गाण्याचा 28 सेकंदाचा व्हिडीओ ट्वीट केला. या गाण्याचे बोल “कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी..” असे आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी अमृता फडणवीस यांच्या गाण्याचं आणि त्यांचं कौतुक केलं आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की,’काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण @fadnavis_amruta ताई मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा!’
या गाण्याची पोस्ट शेअर करण्यापूर्वी त्यांनी ट्रोलर्स इशारा दिला होता. आठ मार्चला आपलं नवीन गाणं रिलीज होणार असल्याची माहिती अमृता फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. ट्रोलर्सना तयार राहण्याचाही इशाराही त्यांनी दिला होता. माझं आणखी एक गाणं येतंय, मी ट्रोलर्सना या गाण्यातून उत्तर देईन, असं मिसेस फडणवीस म्हणाल्या होत्या.
दरम्यान, अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये “कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी.. हे माझे नाट्य संगीतावर आधारित गीत सादर करते, आज जागतिक महिला दिनी फक्त तुमच्या साठी! हे प्रेरणादायी गीत नक्की ऐका” असं म्हटलं आहे.