पुणे : कोरोनामुळे राज्य सरकारने एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. त्यात तारीख जाहीर होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भुमिका या विद्यार्थ्यांनी घेतली होती. यानंतर अखेर पोलिसांनी परिसरातील लाईट घालवली आणि सर्व आंदोलकांची धरपकड सुरू केली. यावेळी गोपीचंद पडळकर, विक्रांत पाटिल यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अचानकपणे एमपीएससी परीक्षा पुढे ढकलल्याने परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आज संतप्त होऊन रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्ध्यांनी शहरात तीव्र आंदोलन केले. पोलिसांनी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आंदोलकांना ताब्यात घेतलं. तसेच आंदोलक विद्यार्थ्यांना पांगवलं. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा रस्त्यावर उतरला होता.
पोलिसांनी लाईट घालवून या आंदोलक विद्यार्थ्यांची धरपकड केल्याची घटना घडली आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुपार पासूनच विद्यार्थी आंदोलन करत होते. एमपीएससीची परिक्षा रद्द का केली, असा सवाल विचारत या विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती.
दरम्यान, रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हर्च्यूअल संवाद साधून, उद्या परिक्षेची तारीख जाहीर केली जाईल, असे सांगितले. मात्र, तारीख जाहीर होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली होती.
यानंतर अखेर येथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी परिसरातील लाईट घालवली आणि सर्व आंदोलकांची धरपकड सुरु केली. यावेळी गोपींचंद पडळकर, विक्रांत पाटील यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी, सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप पडळकरांनी केला. याशिवाय परीक्षा पुढे ढकलल्यामुळे राज्यातील पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, नागपूर, कोल्हापूर, वाशिम, परभणी, अमरावती आदी शहरांमध्ये विद्यार्थी सरकारच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले होते.
* विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ – प्रवीण दरेकर
महाविकास आघाडी म्हणते, कोरोना काळात महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही. मग आज या परीक्षा का थांबवल्या? परीक्षा नाही तुम्ही विद्यार्थ्यांचं भविष्य थांबवलं आहे. कोरोना काळात नियोजन करावं लागतं, एमपीएससी परीक्षांबाबत या सरकारने काहीच नियोजन केलं नाही. केवळ कोरोनाचे कारण दाखवून परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. काहीच न करता विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळायचं काम हे सरकार करत आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केला.
एमपीएससीच्या परीक्षा रद्द करण्यामागे ठाकरे सरकारची बेफिकीरी आहे. आम्ही काहीही, कसेही करू, हेच यामागे कारण आहे. कोरोनामध्ये शुटींग होतं, इतर कार्यक्रमात गर्दी होते, पबला गर्दी होते. पण परीक्षा होत नाहीत. मुलांच्या भविष्याशी खेळण्याचा प्रयत्न ठाकरे सरकार करत आहे, असे विरोधी पक्षाचे प्रविण दरेकर यांनी म्हटले आहे. तर, अजब सरकारची ही गजब कामगिरी आहे, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
* ‘एमपीएससी परीक्षेवरून विरोधकांनी राजकारण करू नये’
एमपीएससीच्या परीक्षेबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी मोठी घोषणा केली. तसेच, यावरून विरोधकांनी राजकारण करू नये. कोरोनामुळे काही बदल करावे लागत आहेत, असे ठाकरेंनी म्हटले आहे. तर, पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सामील झालेले भाजप आमदार गोपिचंद पडळकर आजच निर्णय झाला पाहिजे, या मागणीवर ठाम आहेत. परीक्षा पुढे ढकलणे हा विद्यार्थ्यांवर अन्याय, त्यांची हत्या आहे, असे पडळकर म्हणाले.