मुंबई : पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसने खळबळ उडाली आहे. माझे अधिकारी मला चुकीच्या पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत, आधीही मला त्रास दिला गेला. आता आपल्याकडे संयम नाही, जगाला गुडबाय करण्याची वेळ जवळ आली, असे स्टेटसमध्ये लिहिलेले आहे. दरम्यान मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. त्यानंतर त्यांची बदलीही करण्यात आली.
* तब्बल दहा तास चौकशी
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणांत चौकशीच्या घेऱ्यात अडकलेले गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे सचिन वाझे यांची दहशतवाद विरोधी पथकाने तब्बल दहा तास चौकशी केली आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटके आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पिओ कार सापडली. याचा तपास वाझे यांच्याकडे सोपविण्यात आला. या स्कॉर्पिओ कारचा ताबा असलेल्या ठाण्यातील व्यापारी मनसुख यांचा मृत्यू झाला आणि वाझे संशयाच्या भोवऱ्यात सापडले. विरोधी पक्षाने त्यांचे निलंबन करुन अटकेची मागणी केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तपास राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविला.
* व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे दावा
3 मार्च 2004 रोजी सीआयडीमधील काही अधिकाऱ्यांनी मला एका खोट्या प्रकरणात अटक केली होती. मला केलेली ही अटक आजपर्यंत अयोग्य आहे. या इतिहासाची मला आता पुन्हा जाणीव करुन देत आहे. माझे सहकारी- अधिकारी मला चुकीच्या प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा सचिन वाझे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसद्वारे केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सचिन वाझे पुढे म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत थोडा फरक आहे. 17 वर्ष माझ्याकडे अपेक्षा, सहनशीलता, आयुष्य आणि नोकरीही होती, पण आता माझ्याकडे आयुष्याची 17 वर्षेही नाहीत, ना नोकरी, ना जगण्याची अपेक्षा आहे. मला वाटतं जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ येत आहे, असं म्हटल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
* विशेष शाखा १ येथे बदली
दरम्यान, विरोधकाच्या आक्रमक पवित्र्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गृहमंत्र्यांनी वाझे यांची बदली करण्याचे आदेश दिले. त्यानंतर वाझे यांची बदली कुठे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर, शुक्रवारी त्यांची विशेष शाखा १ येथे बदली करण्यात असून त्यांच्याकडे नागरी सुविधा केंद्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अशात बदली झाल्यानंतर वाझे यांनी प्रतिक्रिया देताना, मी क्राईम ब्रान्चच्या सेवेतून मुक्त झालो असे सांगत जास्त बोलणे टाळले होते. मात्र सचिन वाझेंनी व्हॉट्सअॅपवर एक धक्कादायक पोस्ट शेअर केली आहे.