दादा कोंडके माझा आवडता अभिनेता. 14 मार्च 1998 ला दादा आपल्याला सोडून गेले. दादाचा आज स्मृतीदिन आहे.
8 आँगस्ट 1932 साली दादांचा जन्म नायगाव मुंबई येथे झाला. दादांचे खरे नांव कृष्णा ठेवले होते. दादांचा गोकुळाष्टमी झाला. त्यामुळे त्यांचे नाव “कृष्णा” ठेवण्यात आले होते. दादांनी मराठी चित्रपट क्षेत्रात दमदार कामगिरी करून आपले नाव सार्थकी लावले. दादांच्या वडिलांचे मुळगाव हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील इंगवली आहे. दादाचे वडिल हे गिरणी कामगार होते. त्यामुळे दादांचे जडणघडण गिरीणी कामगारांच्या चाळीत झाली.
स्वभावातच खोडकर असलेल्या दादांनी ’दादा कोंडके आणि पार्टी’’ नावाचे एक कला पथक स्थापन केले. दादाच्या याच कला पथकाने वसंत सबनिसांच्या “विच्छा माझी पुरी करा” ह्या नाटकाचे प्रयोग केला. अन् याच नाटकांने दादांना महाराष्ट्रात स्टार केले. या नाटकाच्या तब्बल 1500 च्या वर प्रयोग महाराष्ट्रात झाले.
त्यानंतर 1969 साली भालजी पेंढारकरांच्या “तांबडी माती” ह्या चित्रपटातून दादांनी मराठी चित्रपट क्षेत्रात दमदार एन्ट्री केली.
त्यानंतर 1971 साली दादांची प्रमुख भूमिका आलेल्या “सोंगाड्या ” ला महाराष्ट्राने डोक्यावर घेतले. त्यानंतर हसरे व खेळकर व्यक्तिमत्त्व लाभलेल्या दादांनी मागे वळून बघितलचं नाही.
दादांच्या लोकप्रियतेची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली. गिनीज बुक आँफ रेकाँर्डमध्ये दादांच्या चित्रपटांची नोंद घेतली गेली.
मनमूराद खळखळून हसायला लावणारा “दादा” नट. सगळ्यांना जवळचा वाटणारा गावातील माणूस. दादा तसा आमच्या पिढीचा नट नाही. मी बारका होतो त्यामुळे ते दादाचं डबल मिनिंगवालं काय कळायचं नाही. पण दादाच्या पिच्चरमधे जे प्राणी असायचे ते बघून मजा वाटायची. दादाच्या पिच्चरमधे प्राणी बघून लयच भारी वाटायचं. खेड्यातील जिवन दादाच्या पिच्चरमधे बघून एकदम हरकून जायचो. “राम राम गंगाराम” मधील दादाचं बोकडं, ते बोकडंबी हिरोईन उषा चव्हाणच्या शेळी माघं हिंडायचं अन् दादा त्येज्या माघं. या सगळ्या गंमती जमतीत आमचं बालमन गुंतून जायचं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तर “पळावा पळवी” या पिच्चरमधील दादाची म्हैस, त्या म्हशीवर दादान् पांढरे पट्टे वडून स्कूल बसं लिहलेलं, त्या म्हशीच्या शिंगाला गावातल्या पोरांच दप्तर अडकावून पोरं म्हशीवर बसवून दादाची ही स्कूलबस शाळेकडं रवाना व्हायची. रडणारी पोरं, शाळेत जायला नगू मनून पळून जाणारी पोरं बघून असं वाटायचं आता “दादा” आपल्यालाबी गंचूडीला धरून शाळेत नेहतो का काय ? त्या भितीन् एकदम मुरून बसायचं.
“तुमचं आमचं जमलं ” या पिच्चरमधील दादाची बैलगाडी. त्या बैलगाडीच्या खाली दादा पोत्याची झोळी बांधून मस्त झोपलेला. बैल आपली इमानेइतबारे गाडी ओढत चाललेली. अन् गाडी बंद पडल्याने गावात कसं जायचं या विवंचनेत असलेली हिरोईन जयश्री गडकर अन् त्यांच्या मैत्रणी त्या चालक नसलेल्या बैलगाडीचा ताबा घेतात अन् गोंधळात झोप मोड झालेले दादा फळी बाजूला सारून एकदम गाडीत अवतरतात. हे सगळं बघून पोटधरून हसालया यायचं.
दादाचं वाघ्या कुत्रं तर इतकं आपलं वाटायचं की आमच्या घरात लहानपणा पासून जेवढीबी कुत्री झाली त्यांची सगळ्यांची नावं वाघ्याच ठेवलेलं. दादाच्या वाघ्याचं प्रेमबघून आमच्या घरातबी वाघ्याला मोकळा वावर असायचा. ” चल रं वाघ्या रडू नको ” हे गाणं बघून किती तर वेळा धाय मोकलून मी रडलोयं. इतकं दादाचा अभिनय जिवंत वाटायचा.
“एकटा जिव सदाशिव” यी पिच्चरमदी
माणसा परिस मेंढर बरी या गाण्यात् दाखवलेलं धनगरांच जिवन, त्यातली मेंढरं आपली वाटायची. तर सोंगाड्यातील शेतकऱ्याचं जिवन आपलचं वाटायचं. दादाची किती पिच्चर अन त्यातील ग्रामीण जिवन, ते दाखवण्याची दादाची पध्दत इतकं भारी असायचं की लहानपणी बघीतलेलं दादाचे पिच्चर अजून लक्षात आहेत अन् ते रहातील.
आजही दादाचे पिच्चर माझ्या पुतन्यांना खळखळून हसवतात. घरी गेलं की पोरं म्हणतात , ” काका त्या म्हशीवाल्या दादाचा पिच्चर लावा की” तर दुसरा म्हणतो, ” काका वाघ्याचा पण लावा की ! ”
दादाच्या पिच्चरमुळे मला माझा लँपटाँप खऱ्या अर्थाने परिपुर्ण वाटतो. मोठ्यांना दादाच्या पिच्चरमधे काय मिळतं यापेक्षाही लहानांनाही दादांचे पिच्चर पुन्हा पुन्हा पहावे वाटतात यातच दादाच यश सामावलयं. मराठी चित्रपटांच्या संदर्भाने लिहताना दादा कोंडके यांच्याशिवाय पुढे जाता येणार नाहीच. अशा एकटा जीव सदाशीव म्हणत आयुष्य जगलेल्या दादांच्या स्मृतींना अभिवादन करून वाघ्याच्या आठवणीत रमत मी थांबतो.
– © ब्रह्मा चट्टे