कोल्हापूर : महाविकास आघाडी सरकारला सहकारी पक्षाने धक्का दिला आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही कोणाच्या मागे फरफटत जाणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. राज्यात सत्तेवर येताना अनेक पक्षांची मिळून महाविकास आघाडी आकारास आली. मात्र, सध्या तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हेच महाविकास आघाडीत आहेत. इतर छोट्या पक्षांना ते गृहीत धरत नाहीत, असे शेट्टी म्हणाले.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना म्हणजे महाविकास आघाडी, असे काही जण समजत आहेत. महाविकास आघाडी म्हणून आम्ही कोणाच्या मागे फरफटत जाणार नाही, ‘गोकूळ’च्या निवडणुकीत ‘स्वाभिमानी’ची ताकद दाखवू, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
कोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकूळ) निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यात ‘गोकूळ’सह इतर निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढल्या जातील, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. याबाबत ‘स्वाभिमानी’चे नेते राजू शेट्टी यांना विचारले असता, राज्यात सत्तेवर येताना अनेक पक्षांची मिळून महाविकास आघाडी आकारास आली. मात्र, सध्या तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना हेच महाविकास आघाडीत आहेत. इतर छोट्या पक्षांना ते गृहीत धरत नाहीत, असे शेट्टी म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* १९ मार्चला राज्यभर रास्ता रोको
लॉकडाऊनच्या काळातील घरगुती वीज बिले माफ करावीत, या मागणीसाठी १९ मार्च रोजी राज्यभर महामार्ग रोको करण्यात येणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. अधिवेशनाच्या सुरुवातीला वीज कनेक्शन तोडणीस स्थगिती द्यायची आणि शेवटच्या दिवशी उठवायची, हा विधिमंडळाचा अवमान आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने राज्यातील सव्वादोन कोटी ग्राहकांची चेष्टा चालविल्याचा आरोपही त्यांनी केला.
लॉकडाऊनच्या काळातील सहा महिन्यांची घरगुती वीज बिले माफ करावीत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना, शिवसेना, ‘माकप’, ‘शेकाप’ , जनता दल, जनसुराज्य’ आदी पक्ष व संघटनांनी गेले दोन-तीन महिने आंदोलन सुरू केले आहे. केरळ, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यांनी घरगुती वीज बिलांमध्ये सहा महिन्यांसाठी ५० टक्के सवलत दिली आहे. वीज बिलाप्रश्नी बुधवारी (ता. १७) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सर्वपक्षियांना घेऊन चर्चा करणार असल्याचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले. मुख्यमंत्री यावर निश्चितच तोडगा काढतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.