मुंबई : मुकेश अंबानींच्या घराबाहेर काही दिवसांपूर्वी स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं सापडली. या प्रकरणी एनआयएने सचिन वाझेंना अटक केली. यानंतर मोठा खुलासा झालाय. शनिवारी रात्री इनोव्हा गाडी एनआयएने ताब्यात घेतली. अंबानींच्या घरासमोर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ठेवणा-या ड्रायव्हरला मुंबई बाहेर सोडण्यासाठी याच इनोव्हाचा वापर झाल्याची माहिती आहे.
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ठेवून ज्या इनोव्हातून त्या ड्रायव्हरने पळ काढला होता ती इनोव्हा मुंबई पोलिसांचीच असल्याचे समोर येत आहे. एनआयएने इनोव्हा गाडीचे कोडे सोडविल्याचा दावा केला आहे.
सचिन वाझेंना 10 दिवसांची म्हणजेच 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. सचिन वाझेंना काल (शनिवार) 12 वाजण्याच्या सुमारास एनआयएने मुकेश अंबानी घातपाताप्रकरणी अटक केली. आज या प्रकरणी एनआयएच्या सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टात सुनावणी झाली. यावेळी एनआयएने चौकशीसाठी 14 दिवसांची वाझेंच्या कोठडीची मागणी केली. पण, कोर्टाने 10 दिवसांची कोठडी मान्य केल्याचे समोर आले आहे.
अँटिलाया परिसरात दोन गाड्या आल्या होत्या. त्यापैकी एक जिलेटीन ठेवलेली स्कॉर्पिओ आणि दुसरी इनोव्हा कार होती. ड्रायव्हरने स्कॉर्पिओ तिथे पार्क करून इनोव्हा गाडीतून पळ काढला होता. मुंबईहून बाहेर जाणाऱ्या मुलुंड टोलनाक्यावर त्या इनोव्हामध्ये दोन व्यक्ती असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसले होते.
ही इनोव्हा कोणाची होती याचा तपास सुरु होता. यावर आता एनआयएच्या सुत्रांनी खळबळजनक माहिती उघड केली आहे. ही इनोव्हा कार मुंबई क्राईम ब्रांचचीच होती. त्यामध्ये स्कॉर्पियो कारचा मालक मनसुख हिरेन होता. अँटिलिया केसध्ये मुंबई पोलिसांचा आणखी एक अधिकारी रियाज काझी याला ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरु आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सुत्रांनुसार या प्रकरणात दोन वाहने वापरली होती. स्कॉर्पिओ कारच्या मागे इनोव्हा कार जात होती. मुंबईच्या मुलुंड टोलनाक्यावर ही कार दिसली. चेंबूर भागात इनोव्हा आणि स्कॉर्पिओ आणि इनोव्हा कार एकत्र आल्या. त्यानंतर दोन्ही कार या अँटिलियाच्या दिशेने कार्मायकल रोडवर गेल्या. स्कॉर्पिओ तिथेच सोडून ही इनोव्हा ठाण्याच्या दिशेने गेली. ठाण्यामध्ये प्रवेश करताना ही कार पाहिली गेली. यानंतर इनोव्हा कुठेच दिसली नव्हती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील विधानसभेत या कारचा उल्लेख केला होता. सचिन वाझे आणि मनसुख हिरेन दोघेही ठाण्यात राहतात. हिरेन यांची चोरी झालेली स्कॉर्पिओ कार वाझे यांच्याकडे कशी आली याची माहिती मिळविण्यासाठी वाझे राहत असलेल्या सोसायटीचे आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.
* ‘सचिन वाझेंना पुन्हा पोलिस दलात का घेतले?’
‘सचिन वाझे शिवसैनिक होते, म्हणून शिवसेना त्यांना वाचवतेय का? एनआयएवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांनी आरशात पाहिले पाहिजे. पोलिसांमधीलच लोक गंभीर गुन्ह्यात असतील, तर कायदा-सुव्यवस्था राहिल का? वाझेंना पुन्हा पोलिस दलात का घेतले? एवढं मोठं पद का दिलं? ज्यांना अटक झाले तेच तपास अधिकारी होते, हे गंभीर आहे. आतापर्यंत एकच बाजू समोर आली. आणखी खूप बाहेर येणे बाकी आहे’, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.