सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून कालव्याला 20 ते 21 मार्च रोजी, तर भीमा नदीला 23 मार्च रोजी उन्हाळी आवर्तन सुटणार असल्याची माहिती आमदार बबनराव शिंदे यांनी दिली आहे. याबरोबरच सीना नदी, सीना-माढा उपसा सिंचन या योजनांनाही पाणी सोडले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उन्हाळ्याची तीव्रता सध्या जाणवू लागल्यामुळे कालव्याला व नदीला पाणी सोडण्याची मागणी वाढू लागलेली आहे. प्रत्येक भागातून शेतकरी आमदार शिंदे यांना पाणी सोडण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी करत होते. त्यातच शेतकऱ्यांना गेली वर्षभर कोरोनामुळे प्रचंड नुकसानीचा सामना करावा लागला आहे. मार्च महिना सुरू असून, उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याअभावी शेतातील पिके करपू लागली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यामुळे आमदार बबनराव शिंदे यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यांनी पाणी सोडण्याचे मान्य केले आहे.
* उजनीत प्लस 64 टक्के पाणीसाठा
उजनी धरणामध्ये सद्यस्थितीला प्लस 64 टक्के पाणीसाठा आहे. धरणात पाणी मुबलक असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांना फायदा व्हावा, अशी अपेक्षा आहे. या पाण्यामुळे ऊस, केळी, द्राक्ष, मका, भुईमूग, मूग या पिकांना फायदा होणार आहे. हे आवर्तन मार्च ते एप्रिल या महिन्यात देण्यात येणार असून, हे आवर्तन संपल्यावर उन्हाळी हंगामात दुसरे आवर्तनही सोडण्यात येणार असल्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले.