सोलापूर : महापालिकेतील भाजपच्या प्रभाग क्रमांक 26 च्या नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे नगरसेवकपद मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. यामुळे भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. तीन अपत्ये असल्याची तक्रार त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या उमेदवार अॅड.उमा पारसेकर यांनी केली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अजुना प्रभुदेसाई यांच्यासमोर ही सुनावणी झाली.
महापालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविका राजश्री चव्हाण यांचे नगरसेवकपद रद्द करीत उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांचा निर्णय कायम ठेवल्याची माहिती ऍड. अजित आळंगे यांनी दिली.
महापालिकेच्या निवडणुकीत 2017 मध्ये प्रभाग क्र. 26 (ब) मधून राजश्री चव्हाण यांनी विजय मिळविला. काँग्रेसचे उमेदवार ऍड. उमा पारसेकर यांचा चार मतांनी पराभव केला. मात्र, चव्हाण यांना तीन अपत्य असून 12 सप्टेंबर 2001 नंतर जन्मलेले तिसरे अपत्य असल्याचे सांगत त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी पारसेकर यांनी ऍड. अजित आळंगे यांच्या माध्यमातून सोलापूरच्या दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांच्याकडे केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्याठिकाणी 2018 मध्ये दिवाणी न्यायालयाने चव्हाण यांचे नगरसेवकपद रद्द ठरविले. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. चव्हाण यांनी त्यांच्या नामनिर्देशनपत्रात तीन अपत्ये असल्याचे कबूल केल्याचे ऍड. आळंगे यांनी न्यायालयास सांगितले.
त्यांनी तीन अपत्ये नसल्याबाबत अद्याप कोणताही पुरावा समोर आणलेला नाही, असेही निदर्शनास आणून दिले. त्यावर न्यायालयाने चव्हाण यांच्याविरोधात निकाल दिला. दरम्यान, चव्हाण यांच्यातर्फे ऍड. अशोक ताजणे हे काम पाहत असून त्यांच्या विनंतीवरून न्यायालयाने चव्हाण यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत दिल्याचे सांगितले.