कोलकाता : मोदी सरकारला सक्षम विरोधक म्हणून नवा पर्याय (अल्टरनेटीव्ह प्रोग्रेसिव्ह मंच) निर्माण करण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुरु केल्याचे सध्या संकेत मिळत आहेत. पश्चिम बंगाल, केरळसह पाच राज्याच्या विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आल्या आहेत. या निवडणुकांमध्ये काँग्रेसने केंद्रात सोबत असलेल्या पक्षांना बगल देत त्यांच्या विरोधातच दुसऱ्या पक्षांना सोबत घेऊन आघाडी केली आहे.
यामुळे आता काँग्रेस वगळून साऱ्या विरोधकांना एकाच मंचावर आणण्याची तयारी सुरु झाली आहे. खुद्द शरद पवार यांनी यासाठी पुढाकार घेतल्याने राजकीय गोटात खळबळ माजली आहे. शरद पवार यांनी काल त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन देशाला तिसऱ्या आघाडीची गरज असल्याचं म्हटलं आहे.
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींसमोर यांच्यासमोर तगडे आव्हान निर्माण झाले आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजप, तृणमूल आणि काँग्रेस-डावे अशी तिहेरी लढत होत आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नाव हे तृणमूलच्या स्टार प्रचारकांच्या यादीत सामिल करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा समावेश केला आहे. त्यामुळे आता राजकीय समीकरणे बदलली आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पश्चिम बंगालसारख्या राज्यात केंद्रीय नेतृत्त्वाकडून सुरू असलेले हल्ले पाहता लोकशाहीचा आदर करणाऱ्या कोणत्याही पक्षानं ममता बॅनर्जींना पाठिंबा द्यायला हवा, असे विधान पवारांनी केले होते. यानंतर काँग्रेसचे नेते प्रदीप भट्टाचार्य यांनी शरद पवारांना एक पत्र लिहिले आहे. पश्चिम बंगालमध्ये येऊन तृणमूलचा प्रचार करू नका, असे आवाहन त्यांनी केलंय. तुम्ही स्टार प्रचारक म्हणून बंगालमध्ये आल्यास मतदारांचा गोंधळ होईल. त्यामुळे तृणमूलसाठी प्रचार करणे टाळा असे ते म्हणालेत.
देशभरात अनेक ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे. त्यामुळे केवळ बंगालमध्ये पवार यांना काँग्रेसविरोधात म्हणजेच ममतांच्या बाजूने भूमिका घ्यावी लागणार आहे. जेणेकरून काँग्रेसचे मतदार संभ्रमित होऊ शकतात अशी भीती काँग्रेसला आहे. त्या अनुषंगाने भट्टाचार्य यांनी पत्र लिहिले आहे.