मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता नव्या गाईडलाईन्स जारी केल्या. राज्यातील सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश देण्यात आले. नाट्यगृहे व सभागृहे यामधील उपस्थिती ५० टक्के असावी. तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही, असं यात नमूद करण्यात आलं आहे.
मुंबईसह राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. राज्यात सोमवारी नव्या १५ हजार ०५१ रुग्णांची नोंद झाली आहे. तर २४ तासांत ४८ जणांचा मृत्यू झाला असून राज्यात मृत्यूदर २.२७ टक्के इतका आहे. ही वाढती रुग्णसंख्या पाहता राज्य सरकारने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी नव्या गाईडलाइन्स जागू केल्या आहेत. यानुसार यापुढे राज्यातील सर्व नियमावली अधिक कडक करण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्यातील सर्व रेस्टॉरंट, थिएटर्स (सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्लेक्स) ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. मात्र यावेळी नियम अधिक कडक करण्यात आले असून मास्क शिवाय कोणालाही आत येण्याची परवानगी नसेल. याशिवाय आस्थापनांमध्ये ठिकठिकाणी सॅनिटायझर लावणे ही बंधनकारक करण्यात आले आहे.
दरम्यान, नियमांचे उल्लंघन केल्यास कोरोना जाईपर्यंत ते रेस्टॉरंट किंवा थिएटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही गाइडलाइन्समध्ये जारी करण्यात आले आहे. याशिवाय शॉपिंग मॉल्सनाही हे नियम अनिवार्य राहतील.
महत्त्वाचे म्हणजे राज्यातील सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. लग्न समारंभासाठी ५० लोकांना परवानगी असेल तर अत्यंसंस्कारात २० पेक्षा जास्त जणांना परवानगी नाही.
– कोरोना: राज्य शासनाच्या नव्या गाईडलाईन
* सर्व खासगी कार्यालये आणि आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचारी संख्या ठेवा.
* नाट्यगृहे, सभागृहे यामधील उपस्थिती 50 टक्के असावी.
* सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांच्या विभाग आणि कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे.
*धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे व सभा अशा इतर कारणांसाठी गर्दी करता येणार नाही.