वेळापूर : वेळापूर परिसरातील वारकऱ्यांनी पालखी कट्ट्याजवळ भजन करून येथे होणा-या उड्डाणपुलाला विरोध केला आहे. वारकरी संप्रदायाने भजनातून या उड्डाणपुलाला विरोध दर्शविला आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील परंपरांचे जतन व्हावे यासाठी शासनाने वेळापूर येथील उड्डाणपूलाबाबत योग्य निर्णय घेवून पालखीची परंपरा जतन करावी, अशा मागणीचे पत्र श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्थ अभय टिळक यांनी दिले आहे.
वेळापूर येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर धुमाळी ते वेळापूर बस स्थानक यादरम्यान उड्डाणपूल करण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. हा उड्डाणपूल झाल्यास श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यात वेळापूरच्या मुक्कामाआधी पूर्वापार चालत आलेला धावा , विसावा , मानाचे भारुड यांची परंपरा खंडित होणार आहे. यास गावपातळीवर वेळापूर ग्रामस्थ व वारकरी संप्रदायाने उड्डाण पुलाला विरोध केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यास वेळापूर येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतळावर ग्रामस्थ व वेळापूर परिसरातील वारकरी संप्रदायांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीस राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर, आळंदी संस्थांचे प्रतिनिधी पुरुषोत्तम उत्पात , जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब धाइंजे , उपसरपंच जावेद मुलानी, धानोरेचे सरपंच जीवन जानकर , माजी उपसरपंच पांडुरंग मंडले , व्यापारी रायचंद खाडे , उद्योगपती राजू शिंदे , मदनसिंह माने देशमुख , शिवाजी बनसोडे , प्रा. धनंजय साठे, रजनिश बनसोडे, भाऊसाहेब जानकर, यांच्यासह वारकरी संप्रदायातील मानकरी व गावकरी उपस्थित होते.
या बैठकीस उत्तमराव जानकर म्हणाले , श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर धावा ते वेळापूर बस स्थानक या मार्गावर भरीव असा उड्डाणपूल होणार असल्याने हा उड्डाणपूल वारकऱ्यांसाठी त्रासदायक ठरणार आहे. पालखी सोहळ्याची परंपरा जोपासण्यासाठी येथील उड्डाणपूल रद्द करून तो अकलूज सांगोला असा केल्यास पालखी सोहळ्याच्या दृष्टीने सोयीचे होणार आहे. उड्डाणपूला संदर्भात आज लक्ष दिले नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही . शासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली.
आळंदी संस्थांचे प्रतिनिधी पुरुषोत्तम उत्पात यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्थ अभय टिळक यांनी दिलेले निवेदन वाचून दाखवले. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापक सुहास चिटणीस व जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याशी तातडीने संपर्क करून यासंदर्भात आवश्यक तो पत्रव्यवहार करू, असे सांगितले.
यावेळी वेळापूर परिसरातील वारकऱ्यांनी पालखी कट्ट्याजवळ भजन करून आपल्या भावना व्यक्त केल्या. ह भ प अमोल महाराज टिंगरे यांनी वारकरी संप्रदायाचा उड्डाणपुलाला विरोध असल्याचे सांगितले.
* केली कमिटीची स्थापना
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर होणाऱ्या उड्डाणपुलाच्या संदर्भात शासनाशी विचार विनिमय करण्यासाठी वेळापूर ग्रामस्थांच्यावतीने सरपंच विमल जानकर यांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी स्थापन केली. या कमिटीमध्ये दशरथ बनकर , रमाकांत देशपांडे , सूर्यकांत भिसे व बाळासाहेब धाइंजे यांचा समावेश केला. या कमिटीच्या माध्यमातून शासन दरबारी योग्य त्या मागण्या मांडून पाठपुरावा करावा, असे ठरविण्यात आले.