नवी दिल्ली : देशात कोरोनाचा कहर कायम असून गेल्या २४ तासांमध्ये वाढलेली रुग्णसंख्या चिंता वाढवणारी ठरत आहे. यावर्षीची आकडेवारी हे मागील वर्षभरातील कोरोना रुग्णसंख्येचा रेकॉर्ड तोडताना दिसत आहेत. गेल्या २४ तासांत ४३ हजार ८४६ कोरोनाच्या नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर १९७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. ही माहिती केंद्रीय मंत्रालयाने रविवारी दिली.
सध्या देशात आढळणाऱ्या एकूण नव्या रुग्णांमधील ८३.१४ टक्के रुग्ण केवळ ६ राज्यात असल्याची माहिती आहे. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश या सहा राज्यात सर्वाधिक रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना कोरोना निर्बंध काटेकोरपणे पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आरोग्य मंत्रालयाने रविवारी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत ४३ हजार ८४६ कोरोनाच्या नव्या रूग्णांची नोंद झाली आहे.देशातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या ही १ कोटी १५ लाख ९९ हजार १३० वर पोहोचली आहे.
यावर्षीएकाच दिवशी कोरोनाच्या ४३ हजारांहून अधिक रूग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत १९७ लोकांचा मृत्यू झालाअसून, देशातील मृतांचा आकडा हा १ लाख ५९ हजार ७५५ वर पोहचला आहे.
* कित्येक महिन्यांनंतर कोरोना रूग्णांची संख्येत वाढ
आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत २२ हजार ९५६ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आत्तापर्यंत १ कोटी ११ लाख ३० हजार २८८ रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर दररोज नोंदविले जाणारे नवे रूग्ण आणि त्यातुलनेत बरे झालेल्या रूग्णांची संख्या ही अर्ध्यावर गेली आहे. त्याचबरोबर, कित्येक महिन्यांनंतर कोरोना रूग्णांची वाढणारी संख्या ही पुन्हा तीन लाखांच्या पुढे गेली आहे, तर पूर्वी हाच आकडा दोन लाखांच्या खाली राहिला होता. सध्या देशात कोरोना ॲक्टीव्ह रूग्णांची संख्या ३ लाख ०९ हजार ०८७ आहे.
* कोणत्या राज्यात किती नवीन कोरोना रुग्ण; आकडेवारी
> महाराष्ट्रात सर्वाधिक २७ हजार १३६
> पंजाब २ हजार ५७८
> केरळमध्ये २ हजार ७८
> कर्नाटकमध्ये १ हजार ७९८
> गुजरातमध्ये १ हजार ५६५
> मध्य प्रदेशमध्ये १ हजार ३०८