मुंबई : 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी ठाकरे सरकारच्या संकटात आणखी वाढ होत असल्याचे दिसत आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह हे आता थेट सुप्रीम कोर्टात पोहोचले आहेत. परमबीर सिंह यांचे म्हणणे आहे की, त्यांनी जे आरोप लावले त्याची सीबीआयद्वारे चौकशी व्हायला पाहिजे. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोरील सीसीटीव्ही जप्त करुन त्याची चौकशी करावी म्हणजे तथ्य सर्वांसमोर येईल, असेही ते म्हणाले.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांसंदर्भात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी व्हावी, अशी परमबीर सिंह यांची मागणी आहे. पुरावे नष्ट होण्याआधी या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी करण्यात यावी असं परमबीर यांनी म्हटलं आहे.
ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतही परमबीर यांची बाजू मांडणार आहेत. गृहमंत्र्यांनी सचिन वाझे आणि सोशल सर्व्हिस ब्रांचचे एसीपी संजय पाटील यांना महिन्याला 100 कोटी रूपये गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं.याआधी 24-25 ऑगस्टला गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी अनिल देशमुख यांच्या गैरवर्तनाबद्दल पोलीस महासंचालकांना माहिती दिली होती, असं परमबीर यांनी म्हटलं आहे. पोलीस महासंचालकांनी ही माहिती राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना दिली. टेलिफोनिक इंटरसेप्शनच्या आधारे ही माहिती पुढे आली होती.
रश्मी शुक्ला यांच्या माहितीवर कारवाई न करता त्यांची बदली करण्यात आली. अनिल देशमुख अनेक गुन्ह्यांच्या प्रकरणात हस्तक्षेप करत होते. तपास त्यांच्या सांगण्याप्रमाणे होण्यासाठी तपास अधिकाऱ्यांना सूचना देत होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अनिल देशमुख यांच वागणं त्यांच्या पदाचा गैरवापर आहे. अनिल देशमुख यांच्या गैरवर्तनाची सीबीआय चौकशी करावी असं परमबीर यांचं म्हणणं आहे. परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत अनिल देशमुख यांच्या गैरवर्तनाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर 17 मार्चला परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून बदली करण्यात आल्याचं त्यांनी याचिकेत नमूद केलंय.
परमबीर सिंह यांची बदली केल्यानंतर, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पोलीस अधिकाऱ्यांकडून अक्षम्य चुका झाल्याने सिंह यांची बदली केल्याचं वक्तव्य केलं होतं. परमबीर सिंह यांनी याचिकेत, माझी बदली द्वेषपूर्वक झाल्याचं म्हटलं आहे. “माझ्याविरोधात एकही पुरावा नसताना. चौकशीसाठी कोणाची नोटीस नसताना,” माझी बदली करण्यात आल्याचं परमबीर सिंह याचिकेत पुढे म्हणतात.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली असं पत्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं.
जवळपास आठ पानांचं हे पत्र आहे. त्यात त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले होते. वाझेंना खात्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर मंत्र्यांनी काय काय टार्गेट दिलं होतं आणि कोणी कोणी वाझेंना काय काय सांगितलं होतं, याची सर्व धक्कादायक माहिती या पत्रात देण्यात आली होती.
* ठाकरे सरकारचे संकट वाढण्याची शक्यता; कधीही होऊ शकते ED ची एन्ट्री
आधीच अनेक प्रकरणात अडचणीत सापडलेल्या ठाकरे सरकारचे संकट आणखी वाढणार असल्याचे दिसत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला 100 कोटी रुपये बार वाल्यांकडून वसुल करण्याचे आदेश दिले, असे पत्र परमबीर सिंह यांनी राज्यपालांना पाठवले. पैशांचे इतके मोठे गैरव्यवहाराचा आरोप झाल्याने या प्रकरणात ईडीची कोणत्याही क्षणी एन्ट्री होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सरकार मधील अनेकांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.