पुणे : इंग्लंडविरुद्ध आज कृणाल पांड्याने आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. सामन्यात कृणालनं ३१ चेंडूत नाबाद ५८ धावा केल्या. त्याने पदार्पणाच्या सामन्यात सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. त्यानं २६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. या खेळीनंतर कृणाल भाऊ हार्दिकला मिठी मारून ढसाढसा रडला. काहीच दिवसांपूर्वी कृणालच्या वडिलांचं निधन झालं. वडिलांच्या आठवणीने कृणालला अश्रू अनावर झाले.
भारत विरुद्ध इंग्लंड संघात सुरु झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, गंहुजे येथे झाला. या सामन्यातून अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्याने वनडे पदार्पण केले आहे. या पदार्पणाच्या सामन्यातच त्याने अर्धशतकी खेळी केली. या अर्धशतकी खेळीनंतर कृणाल भावूक झालेला दिसला.
त्याने २६ चेंडूत अर्धशतक झळकावले. त्यामुळे वनडे पदार्पणाच्या सामन्यात सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याचा विक्रम त्याच्या नावावर झाला आहे. कृणालने ७ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ३१ चेंडूत नाबाद ५८ धावांची खेळी केली. यासोबतच पदार्पणात सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत अर्धशतक झळकवणारा देखील तो पहिला भारतीय फलंदाज बनला.
कृणालने पहिल्या वनडेत अर्धशतक करतात बॅट आकाशाकडे उंचावत हे अर्धशतक आपल्या दिवंगत वडीलांना अर्पण केले. हार्दिक आणि कृणाल पंड्या या बंधूंच्या वडीलांचे जानेवारी महिन्यात हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मित निधन झाले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तसेच भारताचा डाव संपल्यानंतरही कृणाल मुलाखत देताना भावूक झाला. त्याला अश्रू अनावर झाल्यामुळे बोलताही येत नव्हते. अखेर नंतर त्याला धाकटा भाऊ हार्दिकने त्याला मिठी मारत आधार दिला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
हा सामना सुरु होण्याआधी कृणाल पंड्या आपला लहान भाऊ हार्दिकच्या हातून कॅप स्वीकारताना देखील कमालीचा भावूक झाला होता. कॅप स्वीकारत तो हार्दिकच्या गळ्यात पडला व त्यानंतर ती कॅप त्याने आभाळाकडे दाखवली होती. हार्दिक आणि कृणाल हे दोघेही त्यांच्या वडीलांच्या फार जवळ होते.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने पहिल्या वनडेत प्रथम फलंदाजी करताना ३१७ धावांचा डोंगर उभारला.