मुंबई : १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने आज सुनावणी केली आहे. सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंह यांना मुंबई हायकोर्टात जाण्यास सांगितले आहे. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराविरोधात ही याचिका दाखल केली होती. त्यात देशमुखांच्या घरातील सीसीटीव्ही जप्त करुन सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडून चुका झाल्याचा ठपका ठेवला होता. त्यानंतर परमबीर सिंह यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींचा हप्ता वसुलीचा गंभीर आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवल्यानंतर परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.के. कौल आणि आर. सुभाष यांच्या खंठपीठासमोर सुनावणी होणार होती. मात्र आता या प्रकरणी तुम्ही हायकोर्टात का गेला नाही, असा सवाल सुप्रीम कोर्टाने केला आहे. तसेच आधी हायकोर्टात जा, असा सल्ला सुप्रीम कोर्टाने सिंग यांना दिला आहे.
माजी पोलीस संचालक सिंग यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एसके कौल आणि आर. सुभाष रेड्डी यांच्या दोन सदस्यांसमोर खंडपीठाकडे सुनावणी होणार होती.
सिंग यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे. तर, दुसरीकडे मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन करण्यात आलेली बदली रद्द करावी, अशी देखील मागणी याचिकेत करण्यात आली होती. मात्र हे प्रकरण एवढं गंभीर होतं तर तुम्ही उच्च न्यायालयात का गेला नाही? असा सवाल विचारला होता.
* अनिल देशमुखांवर आरोप, चौकशी होणार ?
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. राज्य सरकार या प्रकरणी चौकशी करण्यासाठी न्यायालयीन आयोग नेमण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी निवृत्त न्यायमूर्तीमार्फत चौकशी होण्याची शक्यता आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याविषयी निर्णय घेतला जाऊ शकतो.