सोलापूर : शहर-जिल्ह्यातील शिक्षकांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून कोरोनाची प्रतिबंधात्मक लस टोचण्यास प्रारंभ झाला. त्यात जिल्हा परिषद, माध्यमिक, खासगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसह संस्थांमधील सुमारे 32 हजार शिक्षकांचा समावेश आहे.
कोरोनाच्या सुरवातीला अनेक शिक्षक कोरोना बाधित झाले तर काहींचा मृत्यूही झाला. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून शिक्षकांना लस टोचण्यास परवानगी देण्यात आली आहे. काल मंगळवारी काही शिक्षकांना लस टोचण्यात आली असून त्यासाठी त्यांना स्वत: शिक्षक असल्याचे ओळखपत्र घेऊन लसीकरण केंद्रांवर जावे लागणार आहे. शिक्षकांना मोफत लसीकरण केले जाणार आहे. शिक्षकांना खासगी रुग्णालयातूनही लस घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोना रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी शिक्षकांची मदत घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर शहर-जिल्ह्यातील सर्वच शिक्षकांना लस टोचली जाणार असून त्यास मंगळवारी (ता. 23) प्रारंभ झाला असल्याचे
डॉ. अनिरुध्द पिंपळे (जिल्हा समन्वयक, कोरोना लसीकरण, सोलापूर) यांनी सांगितले.
जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली दररोज साडेतीन ते चार हजार संशयितांची टेस्ट केली जात आहे. आज चार हजार 343 संशयितांमध्ये 227 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून त्यात 152 पुरुष आणि 75 महिलांचा समावेश आहे. त्यातील तिघांचा मृत्यू झाला असून ते तिन्ही रुग्ण 14 मार्चनंतर रुग्णालयात दाखल झाले होते.
दुसरीकडे शहरातील 829 संशयितांमध्ये 154 जण पॉझिटिव्ह आढळले असून त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर को-मॉर्बिड रुग्णांनी लस टोचून घ्यावी, रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांनी स्वत:हून कोरोनाची टेस्ट करून घ्यावी, यासाठी जनजागृती करण्यासाठी शिक्षकांची मदत घेतली जाणार आहे. तसे आदेशही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काढले आहेत.