मुंबई : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा राज्यातल्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. आशा भोसले यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. पुरस्काराच्या घोषणेनंतर आशाताईंचे सर्वांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे महाराष्ट्र भूषण ! मात्र, २०१५ साली फडणवीस सरकारच्या काळात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना या पुरस्काराने गौरवित करण्यात आल्यानंतर गेल्या पाच वर्षात हा पुरस्कार कोणत्याही मान्यवर व्यक्तीला देण्यात आला नव्हता. २०२० मध्ये महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची स्थापना केली.
नव्वदीच्या दशकात युतीचं सरकार असताना ‘महाराष्ट्र भूषण’ या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली होती. पहिल्यांदाच हा पुरस्कार प्रख्यात साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना देण्यात आला. दरम्यान, आज या पुरस्काराची आली असून सदाबहार व ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ म्हणून गौरवण्यात येणार आहे. ‘मेलडी क्वीन’ आशा भोसले यांचा जन्म 8 सप्टेंबर 1933 रोजी झाला. गानकोकीळा लता मंगेशकर यांच्या त्या धाकट्या भगिनी आहेत.
‘दिल चीज क्या है, आप मेरी जान लीजिए’ हे आशाताईंच्या आवाजातील गाणं ऐकताना काळीज चिरत जातं, तर ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है’ ऐकताना गलबलून येतं. इतकंच नाही तर, ‘पिया तू अब तो आजा’, ‘मुझे रंग दे..’ ऐकताना पाय आपोआप ठेका धरतात. तर ‘रंगिला’ मधील त्यांच्या गाण्याची भुरळ आजही कायम आहे. आजच्या काळात ही शाळा, महाविद्यालयांच्या स्नेहसंमेलनात त्यांच्या गाण्यावर ठेका धरला जातो.
दुसरीकडं, याच आशाताईंनी ‘मागे उभा मंगेश म्हटलं आहे’ आणि याच आशा भोसलेंनी ‘चुरा लिया है तुमने जो दिल को…’ म्हटलं आहे. गळा तोच, आवाजही तोच मात्र गाण्यातील वैविध्य अफाट ! म्हणूनच खऱ्या अर्थाने सदाबहार आवाज लाभलेल्या आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे, ही चाहत्यांसाठी खुशखबरच आहे.
* ज्येष्ठ गायिका आशाताईंचा अल्पपरिचय
– आशा भोसले या हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपुरी, तमिळ, मलयाळम, इंग्रजी आणि रशियन भाषेत त्यांनी जवळपास 16 हजार गाणी गायले आहेत.
– सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज म्हणजे आशाताई.
– आशाताई या लता मंगेशकर यांच्या लहान बहीण आणि दिनानाथ मंगेशकर यांच्या कन्या आहेत.