सोलापूर / पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लवकरच होणार आहे. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत मोठी फूट पडल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला आहे. सुरुवातीला येथे राष्ट्रवादी आणि भाजप अशी थेट लढत होईल अशी शक्यता होती. मात्र, ऐनवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शिवसेना नेत्यांनी बंडखोरी केली.
पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडली आहे. कारण, महाविकास आघाडीतील महत्वाचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या सोलापूर जिल्हा महिला आघाडीप्रमुख शैला गोडसे यांनी आज शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर होणारी पोटनिवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता सुरुवातीच्या काळात वाटत होती. मात्र, या पोटनिवडणुकीसाठी अनेकांनी दंड थोपटले आहेत. भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात नवीन राजकीय समीकरण पुढे येऊन महाविकास आघाडी अस्तित्वात आली. पण, राज्यातील सत्ता स्थापनेनंतर काही ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून नगरपालिका व जिल्हा परिषदेमध्येही महाआघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापन करण्यात आली.
भारत भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, त्यामुळे पंढरपूर मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा हा नैसर्गिक आहे. शिवसेना व मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसने या निवडणुकीत राष्ट्रवादीला सहकार्य करणे अपेक्षित असतानाच शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख शैला गोडसे यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
* जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ
आमदार होण्यासाठी शैला गोडसे यांनी 2009 पासून तयारी सुरू केली आहे, त्यासाठी त्यांनी मंगळवेढ्याच्या पाणी आंदोलनात सहभाग घेऊन शिरनांदगी व नंदेश्वर येथे आंदोलन केले. याशिवाय तालुक्यातील रस्ते, उजनी धरणातून आणि म्हैसाळ योजनेचे पाणी मिळण्यासाठी आंदोलन केले. याशिवाय इतरही कार्यक्रमात सहभाग घेण्यास सुरुवात केली, त्यामुळे त्या उमेदवारीच्या दावेदार बनत गेल्या.
शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख पदावरील शैला गोडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत अनेक समीकरणाची सुरुवात पंढरीतील झाली आहे, त्यामुळे महाविकास आघाडीत शिवसेनेचे उमेदवार अर्ज दाखल केल्यामुळे त्याचे पडसाद राज्यात उमटणार का? याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.