मुंबई : फोन टॅपिंग प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर सेलमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य गुप्तचर विभागाने याविषयी तक्रार केली आहे. सरकारची दिशाभूल करुन खासगी व्यक्तींचे फोन टॅप केल्याचा आरोप तत्कालीन गुप्तचर आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर आहे. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी टॉप सिक्रेट कागदपत्रांचा दाखला देत गंभीर आरोप केले आहेत. आता फडणवीस व शुक्ला यांच्या चौकशीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यातील पोलिसांच्या बदल्यांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या एका अहवालावरून राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले असतानाच मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने याप्रकरणात एक गुन्हा दाखल केला आहे. राज्य गुप्तवार्ता विभागातील (एसआयडी) गोपनीय पत्र आणि तांत्रिक माहिती बेकायदेशीररीत्या प्राप्त केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून सायबर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त याचा तपास करत आहेत.
राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांचा एक अहवाल उघड केला. त्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हा अहवाल तयार करण्यासाठी काहींचे फोन टॅपिंग करण्यात आले होते. सत्ताधिकारी पक्षाने शुक्ला यांच्यावर अनेक आरोप केले. शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल होणार असल्याचे बोलले जात असतानाच राज्य गुप्तवार्ता विभागाने मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाकडे तक्रार दाखल केली.
राज्य गुप्तवार्ता विभागातील गोपनीय पत्र आणि तांत्रिक माहिती अज्ञात व्यक्तीने बेकायदेशीररीत्या प्राप्त केल्याची तक्रार देण्यात आली आहे. त्यानुसार, अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा रश्मी शुक्ला यांचा अहवाल उघड केला तेव्हा पेन ड्राईव्हमधील डेटा उघड झाल्याची बाब समोर आली. मात्र शासनाला जेव्हा हा अहवाल प्राप्त झाला होता. तेव्हा त्याच्यासोबत हा पेन ड्राईव्ह नव्हता. प्रसारमाध्यमात उघड झालेल्या अहवालाची प्रत ही शुक्ला यांच्या कार्यालयातील प्रत असल्याचे समोर आले आहे. ही प्रत त्यांच्याकडूनच लीक करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. हा संशय खरा ठरल्यास शुक्ला यांच्यावर कठोर कारवाईची शक्यता आहे.