नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल काल अहमदाबादमध्ये गृहमंत्री अमित शहा यांना भेटल्याची चर्चा आहे. ही भेट झाल्याचे शहा यांनीही नाकारलेले नाही. भेटीबाबत त्यांना विचारले असता ‘प्रत्येक भेटीतील चर्चा सार्वजनिक करता येत नाही नाही’, असे म्हणत शहा यांनी या भेटीबाबतचे गुढ कायम ठेवले. या भेटीवरून राज्यात तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.
शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती ‘दिव्य भास्कर’ या गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते. त्यानंतर शांतिग्राममधील गेस्टहाऊसला तिघांची भेट झाली, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे. या भेटीचे परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, राष्ट्रवादीने हे वृत्त फेटाळलं आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व नेते प्रफुल पटेल यांनी भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. गुजरात मध्ये जाऊन ही भेट घेतल्याची सांगतिले जात आहे. या भेटीबाबत पत्रकारांनी अमित शाह यांना विचारले असता ते म्हणाले की, ‘सर्व काही सार्वजनिक केल्या जाऊ शकत नाही’. दरम्यान, अमित शाह यांच्या या वक्तव्यावरुन ही भेट झाल्याची अप्रत्यक्ष कबुली त्यांनी दिल्याचे बोलले जात आहे.
मागील काही दिवसांपासून सचिव वाझे प्रकरण, मनसुख हिरेन हत्या, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचा लेटर बॉम्ब, गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांचा गोपनीय अहवाल आदी मुद्यांनी महाविकास आघाडी सरकार घेरले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांनंतर विरोधकांकडून सरकारवर जोरदार टीका सुरू आहे. या सर्व प्रकरणात दररोज नवे खुलासे होत असल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
* महाविकास आघाडीमध्ये धुसफूस
विरोधकांनी गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बदली रॅकेटचा अहवाल थेट केंद्र गृहसचिवांना देत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. भाजप नेत्यांनी राज्यपालांचीही भेट घेतली. या प्रकरणामुळे सरकारची प्रतिमा मलिन झाल्याचे सरकारमधील अनेक मंत्र्यांनी मान्य केले आहे. याबाबत काँग्रेसमधील काही नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. खासदार संजय राऊत यांनीही देशमुख यांच्यासह सरकारला घरचा आहेर दिला आहे. यावरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे.
* गुजराती वर्तमानपत्रामध्ये भेटीची बातमी
अहमदाबाद येथे एका खास विमानाने शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल गेले. त्याठिकाणी एका बड्या उद्योगपतीचीही त्यांची भेट झाल्याची चर्चा आहे. त्यानंतर ते दोघे अमित शहांना भेटले. भेटीचे कारण कळू शकले नाही. तसेच भेटीत काय चर्चा झाली याबद्दलही अधिकृतपणे बोलण्यास कोणीही तयार नाही. एका गुजराती वर्तमानपत्रामध्ये या भेटीची बातमी आल्यानंतर त्यावर राजकीय चर्चा स्वाभाविकपणे सुरू झाली. याबाबत प्रफुल्ल पटेल यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.