मुंबई : आधीच संकटात सापडलेल्या महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल चालले असल्याचे दिसत आहे, कारण आता शिवसेनेने राष्ट्रवादीलाच अंगावर घेतले आहे. गृहमंत्र्यांने कमीत कमी बोलावे. ऊठसूट कॅमेऱ्यासमोर जाणे व चौकशांचे जाहीर आदेश देणे बरे नाही. पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त ‘सॅल्यूट’ घेण्यासाठी नसते. ते कणखर नेतृत्व देण्यासाठी असते. हा कणखरपणा प्रामाणिकपणातून निर्माण होतो हे विसरून कसे चालेल?, असेही सामनात म्हटले आहे. यावर अजित पवारांकडून शिवसेनेला तीव्र प्रत्त्युत्तर देण्यात आले आहे.
अनिल देशमुख यांना राज्याचे गृहमंत्रीपद अपघाताने मिळाले असे वक्तव्य शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून खासदार संजय राऊत यांनी केले होते. या वक्तव्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुखांनीं मौन बाळगले असले तरी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी यावर भाष्य करत राऊतांचे विधान खोडून काढले होते.
यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य करत टोला लगावला आहे. पवार म्हणाले की, हे तीन पक्षांचं सरकार आहे. कुणाला मंत्री करायचं हा तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना अधिकार आहे. राष्ट्रवादीत कोणाला मंत्री करायचं हा शरद पवार यांचा अधिकार आहे. हे तीन पक्षाचं सरकार असताना या पक्षांशी संबंधित व्यक्तींनी एकमेकांना वक्तव्य करुन अडचणीत आणण्याचा प्रयत्न करु नये.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री कोण असावेत, मंत्री कोण असावेत हे ठरवलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्रित काम करत असताना कुणीही त्यात मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करु नये, असे अजित पवार यांनी नाव न गेट राऊतांना टोला लगावला आहे.
* महाविकास आघाडीमध्ये धुसफूस
विरोधकांनी गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बदली रॅकेटचा अहवाल थेट केंद्र गृहसचिवांना देत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. भाजप नेत्यांनी राज्यपालांचीही भेट घेतली. या प्रकरणामुळे सरकारची प्रतिमा मलिन झाल्याचे सरकारमधील अनेक मंत्र्यांनी मान्य केले आहे. याबाबत काँग्रेसमधील काही नेत्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. खासदार संजय राऊत यांनीही देशमुख यांच्यासह सरकारला घरचा आहेर दिला आहे. यावरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे.