ठाणे : डोंबिवलीच्या क्रिडा संकुलातील कोव्हिड सेंटरमध्ये कर्मचारी सेंटर परिसरात दारुची पार्टी करत असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारू पिण्यास मज्जाव करणाऱ्या तरूणाने त्यांचा व्हिडिओ काढला आहे. व्हिडिओ काढणाऱ्या त्या तरूणाला येथील कर्मचाऱ्यांनी मारहाण केली आहे. दरम्यान, या कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाने कामावरुन काढून टाकले आहे.
कोरोना रुग्णांसाठी कोविड सेंटर ही महत्त्वाची जागा आहे. रुग्ण बरे होण्यासाठी कोविड सेंटर तयार करण्यात आले आहेत. मात्र याच कोविड सेंटरमध्ये चोरी, बलात्कार असे प्रकार समोर आले आहेत. मात्र डोंबिवलीच्या कोविड सेंटरमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. होळीच्या आदल्या दिवशी डोंबिवली क्रीडा संकुलातील कोविड सेंटरमध्ये कर्मचारी कोविड सेंटरच्या परिसरात दारु,हुंका आणि गांजाची पार्टी करताना दिसून आले आहेत. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद करण्यात आला. कोविड सेंटरच्या बाहेर दारु गांजा पिण्यापासून रोखले असता त्यांनी तरुणाला बेदम मारहाण केली. या घटनेमुळे डोंबिवलीच्या कोविड सेंटरमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
डोंबिवलीच्या क्रीडा संकुलात महापालिकेने कोविड सेंटर उभारले आहे. पालिकेने काही कंत्राटदारांना हे कोविड सेंटर चालवण्यास दिले होते. त्या कर्मचाऱ्यांनी कोविड सेंटरच्या बाजूला छोटे शेल्टर टाकले होते. त्या शेल्टरमध्ये कर्मचाऱ्यांच्या रोज पार्ट्या चालत. अनेक वेळा त्यांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र कर्मचारी कोणालाही दाद देत नव्हते.
कोविड सेंटरच्या बाजूच्या शेल्डमध्ये दररोज हुक्का दारु आणि गांजाची पार्टी चालते हे एका तरुणाच्या लक्षात आले. हा तरुण डोंबिवलीत एसी रिपेरिंगचे काम करतो. तरुणाने दारु पिणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगल्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न केला मात्र कर्मचारी ऐकायला तयार नाही म्हणून तरुणाने त्यांचा व्हिडिओ काढला. आपला व्हिडिओ काढला जात आहे हे कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तरुणास बेदम मारहाण केली. त्यानंतर तरुणाने हा संपूर्ण प्रकार कोविड सेंटरच्या प्रशानाच्या निदर्शनास आणून दिला. प्रशासनाने तात्काळ त्या कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले.
* कोरोनाग्रस्तांच्या सुरक्षेबाबत प्रश्न
दरम्यान, हा व्हिडीओ समोर आल्यानंतर कोव्हिड सेंटरच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्यात आले आहे. मात्र, असे असले तरी कोरोनावर उपचार घेणाऱ्या महिलांवर बलात्काराचा प्रयत्न, विनयभंग, चोरी असे अनेक प्रकार यापूर्वी कोव्हिड सेंटरमध्ये घडले आहेत. त्यानंतर ही घटना समोर आल्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाग्रस्तांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. तसा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.