सोलापूर : राष्ट्रवादीचे नेते आणि पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणुकीला रंगत आली आहे. अखेर एकदिवसाआधी राष्ट्रवादीने आपल्या उमेदवाराची घोषणा केली आहे. भारत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांनाच उमेदवारी जाहीर केली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मान्यतेने पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी सोशल मिडियावरून दिली.
पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून कुणाला उमेदवारी देणार याकडे सर्वांना उत्सुकता लागली होती. अखेर राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भगीरथ भालके हे उद्या मंगळवारी आपला उमदेवारी अर्ज दाखल करणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत भालके यांचे 27 नोव्हेंबर 2020 रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची जागा रिक्त झाली. दिवंगत आमदार भारत भालके यांच्या जागेवर त्यांचे पुत्र भगीरथ भालके किंवा त्यांच्या पत्नी जयश्री भालके यांना राष्ट्रवादीवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. अखेर मुलाच्या नावावर राष्ट्रवादीकडून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
* भगीरथ भालके यांना शुभेच्छा!
या मतदारसंघात आता १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत असून, त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार निश्चितबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होती. उमेदवारीबद्दल चर्चा सुरू झाल्यानंतर भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, त्यांच्या उमेदवारीला पक्षातीलच काही पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या निर्णयाकडे सगळ्याचं लक्ष लागलं होतं.
जयंत पाटील यांनी ट्वीट करून भगीरथ भालके यांच्या नावाची घोषणा केली आणि त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. “शरद पवार यांच्या मान्यतेनं पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात येत आहेत. ते नक्की विजय होतील, असा आम्हाला विश्वास आहे. भगीरथ भालके यांना शुभेच्छा!,” असं पाटील यांनी म्हटलं आहे.
* उद्या राजकीय धुळवड
उद्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे समाधान आवताडेंचा अर्ज दाखल करण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खा विजयसिंह मोहिते-पाटील, महादेव जानकर, गोपीचंद पढळकर यांच्यासह जिल्ह्यातील आजी माजी आमदार पदाधिकाऱ्यांची फौज पंढरपुरात दाखल होत आहे. यावेळी भाजपकडून मेळावा होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून उद्या भगीरथ भालके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाचा एबी फॉर्म घेऊन पुन्हा स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी सह इतर पक्षातील प्रमुख दिग्गज नेते पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पंढरपुरात येत आहेत. त्यामुळे अर्ज भरल्यानंतर प्रचाराची दिशाही स्पष्ट होणार आहे. यावेळी एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता असल्याने उद्या राजकीय धुळवड पाहवयास मिळणार आहे. उद्या पंढरपुरमध्ये येत असलेले मोठे नेते त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले असले तरी प्रशासन ही कामाला लागले आहे.