सोलापूर : इन सोलापूर न्यूज चॅनलचे ज्येष्ठ पत्रकार सुरेश बहिरवाडे (वय ६०) यांचे आज सोमवारी, पहाटे ५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि भाऊ असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा दुपारी नवीपेठेतील त्यांच्या निवासस्थानापासून निघून त्यांच्यावर रुपाभवानी मंदिरानजीकच्या लिंगायत स्मशानभूमीत अर्थात रुद्रभूमीमध्ये वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सुरेश बहिरवाडे यांनी इन सोलापूर न्यूज चॅनलसह अनेक प्रसारमाध्यमांमध्ये प्रभावीपणे काम केले. मंगळवार बाजार, दूध बाजार, लक्ष्मी मंडईतील व्यापाऱ्यांच्या समस्यांसह अनेक समस्यांना त्यांनी वाचा फोडून, समस्या सोडवल्या. वीरशैव गवळी समाजाच्या प्रत्येक कार्यात त्यांचा पुढाकार होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एक निर्भीड आणि प्रत्येकाच्या मदतीला निस्वार्थीपणे तात्काळ धावून जाणारे पत्रकार म्हणून ते सर्वपरिचित होते. ते एक शीघ्रकवी म्हणूनही प्रसिद्ध होते. त्यांना मराठी आणि हिंदी शेरोशायरी लगेचच सुचायची. समयसूचकतेचे त्यांना भान होते. पत्रकारितेपूर्वी ते टीव्ही आणि रेडिओ रिपेअरीचे काम करायचे. श्री सिद्धेश्वर महायात्रा, शिव जन्मोत्सव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा बसवेश्वर जयंती आदी थेट प्रक्षेपणाचे त्यांनी वर्षानुवर्षे थेट प्रक्षेपणासह असंख्य कार्यक्रमांचे सूत्र संचालनही त्यांनी केले.
आवाजाचे जादूगार म्हणून ते ओळखले जायचे. सोलापूर स्मार्ट सिटीचा माहितीपट तयार करण्याची संधी त्यांना मिळाली. या माहितीपटामुळेच सोलापूर शहराचे नाव केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी यादीत समाविष्ट झाले. सोलापूरच्या सर्वच क्षेत्रातील इत्यंभूत माहिती त्यांना होती. त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता. वयाची साठी पार केल्यानंतरही ते तरुणांनाही लाजवेल अशा पद्धतीने सर्वत्र संचार करायचे. त्यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरानी शोक प्रकट केला. सोलापूरचा चालता बोलता इतिहास हरपला, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.