पंढरपूर : दुष्काळी मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावच्या पाणीप्रश्न सोडवण्यासाठी भारतनानांनी शेवटपर्यंत पाठपुरावा केला. हे काम तात्काळ होण्यासाठी नाना अधिका-यांना दमदाटी करायचे. या पाठपुराव्यामुळेच ११ गावांना म्हैसाळ योजनेतून पाणी दिले. तर उर्वरीत २४ गावांतील ११ हजार १२० हेक्टरसाठी २ टिएमसी पाणी राखीव ठेवले असल्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पंढरपुरात सांगितले.
आज मंगळवारी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जयंत पाटील हे पंढरपूरमध्ये आले असताना आयोजित मेळाव्यामध्ये ते बोलत होते. २४ गावात पाईपलाईन करण्यासाठी टेंडर काढले असल्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी मंचावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार प्रणिती शिंदे, आमदार संजय शिंदे, माजी आमदार दीपक साळुंखे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, युवक अध्यक्ष गणेश पाटील, युवराज पाटील, माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार, चांदापुरी कारखान्याचे अध्यक्ष उत्तमराव जानकर,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे, साईनाथ अभंगराव, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष उमेश पाटील आदींची उपस्थिती होती. तीन पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री जयंत पाटील म्हणाले की, आमदार भारत नाना हे मतदारसंघातील विकासकामे व अडचणीत आलेला विठ्ठल कारखाना सुरू होण्यासाठी आजारी असतानाही सतत पाठपुरावा करायचे. दीपक आबा साळुंखेसह माझ्या ऑफिसमध्ये मुक्कामी थांबायचे. मतदारसंघातील काम कसे मार्गी लावायचे हे नानांच्या चिकाटीवरून आम्हाला समजले. आजारी असतानाही नानांनी पाठपुरावा करत कारखाना सुरू केला पण दुर्दैवाने नाना गेले. मंगळवेढ्यातील पाणी प्रश्न देखील नानांनी सोडवला. नाना नसते तर मंगळवेढ्यातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळाले नसते. यामुळेच हृदयात स्थान निर्माण करणारा नेता आपण सर्वांनी गमावला आहे. कोरोनाच्या संकटात सर्वात जास्त नुकसान पंढरपूर तालुक्याचे झाले असल्याचे सांगितले.