सोलापूर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेने मोठे व्यापारी आणि दुकानदारांना कोरोना चाचणी सक्तीची केली आहे. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. यासाठी सात दिवसांची मुदत दिलीय. त्यानंतर मोठा आर्थिक भुर्दंड आणि कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.
शहरात वाढत्या कोरोना संसर्गावर शासनाने कठोर निर्बंध आणण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी महत्त्वाच्या उपाययोजना केल्या आहेत. शहरातील व्यापाऱ्यांनी कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी प्रशासनाला मदत करावी. त्यांनी कोरोना लस घ्यावी आणि त्याचा पुरावा जवळ ठेवावा.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ॲण्टिबॉडीज टेस्ट करून घ्यावी आणि याबाबतचा एक महिन्याच्या आतील रिपोर्ट जवळ बाळगावा. आरटीपीसीआर कोरोना चाचणी करून 72 तासांपूर्वीचा रिपोर्ट दुकानाच्या दर्शनी भागात लावावा. यापैकी एक रिपोर्ट असणे बंधनकारक आहे. हा रिपोर्ट नसेल तर व्यापारी संस्थांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
* सात दिवसांची मुदत, अन्यथा बसणार भुर्दंड
शहरातील मोठे व्यापारी आणि दुकानदारांना कोरोना चाचणी सक्तीची केली आहे. त्यासाठी त्यांना सात दिवसांची मुदत दिली आहे. त्यांनी चाचणी अहवाल दुकानाच्या दर्शनी भागात लावला पाहिजे. निगेटिव्ह अहवाल नसेल तर पहिल्यांदा दोन हजार रुपये, दुसऱ्यावेळी पाच हजार आणि तिसऱ्यांदा दहा हजार रुपये दंड करण्यात येणार आहे.
याशिवाय पुढील आदेश येईपर्यंत दुकान बंद करण्यात येईल. शहरातील भाजीविक्रेत्यांना यापूर्वीच कोरोना चाचणी सक्तीची केली आहे. या चाचणीत अनेक भाजीविक्रेते कोरोनाबाधित निघाले आहेत. एसटी आणि रेल्वेस्थानकावरही कोरोना चाचणी करण्यात येत आहे.