मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला आहे. देशमुख यांनी पोलिसांना 100 कोटींच्या वसुलीचे आदेश दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. या आरोपांची सीबीआयने चौकशी करावी, असे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर चौकशी होत असताना पदावर राहणं योग्य नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पक्षातर्फे स्पष्ट केली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशीला मुंबई हायकोर्टाने ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख हे गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. हायकोर्टाच्या आदेशामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये हालचालींना वेग आला आहे. अखेर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी याबद्दल घोषणा केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती दिली. ‘मुंबई हायकोर्टाने चौकशीचे आदेश दिले आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांनी स्वत: हुन राजीनामा दिला आहे. ते लवकरच आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवणार आहे’, असं नवाब मलिक यांनी सांगितले आहे.
दरम्यान, त्याआधी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंत्रालयात पोहोचले आहे. त्याआधी शरद पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार आणि शरद पवारांची बैठक झाली. या बैठकीला सुप्रिया सुळे या सुद्धा हजर होत्या. या घडामोडीनंतर अखेर अनिल देशमुख यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.
बिग ब्रेकींग – अनिल देशमुखांचा राजीनामा, चौकशी होत असताना पदावर राहणं योग्य नाही #NCP #HomeMinister #anildeshmukh #राजीनामा #ठाकरेसरकार #Enquiry #surajyadigital #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/z7bwnsiPt7
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 5, 2021
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मी कोणताही गैरव्यवहार केला नसल्याचे म्हटले होते. माझ्यावर करण्यात आलेले भ्रष्टाचाराचे आरोप खोटे आहेत. मी पैशांचा कोणताही व्यवहार केलेला नाही, असे त्यांनी म्हटले होते.
परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये पोलिसांमार्फत वसुली करण्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी परबीर सिंग यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. तसंच परमबीर सिंह यांच्यासह घनश्याम उपाध्याय, मोहन भिडे यांच्या जनहित याचिका तर डॉ. जयश्री पाटील यांची रिट याचिका या सर्व याचिका हायकोर्टानं निकाली काढल्या आहेत. याचिकाकर्त्या डॉ. जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील करतांना असे म्हटले होते कि, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी.
ठाकरे सरकारला धक्का, अनिल देशमुखांवरील आरोपांची सीबीआय चौकशी होणार https://t.co/fh8Q5P6DIA
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 5, 2021
या खटल्याची सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे कि, अनिल देशमुख हे गृहमंत्री असल्याने पोलिस या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करू शकणार नाहीत. अशा वेळी या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात येते आहे.
* गृहमंत्रीपद सोडले; अनिल देशमुख यांचं राजीनामा पत्र
उच्च न्यायालय, मुंबई यांनी त्यांच्याकडे ॲड. जयश्री पाटील यांचेद्वारे दाखल याचिकेमध्ये 5 एप्रिल 2021 रोजी पारित केलेल्या आदेशान्वये त्यांच्या तक्रार अर्जावर सीबीआयमार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पारित केलेले आहेत. त्याअनुषंगाने गृहमंत्री पदावर मला नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही म्हणून मी स्वत:हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेत आहे. सबब मला गृहमंत्री पदावरून कार्यमुक्त करावे ही विनंती.
* ठाकरे सरकारला धक्का, सव्वा महिन्यात 2 मंत्र्यांचे राजीनामे
राज्यातील ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याने राजीनामा दिला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारला सव्वा महिन्यात दोन झटके बसले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे सोपवला. तर याआधी एका युवतीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात अडकलेले शिवसेना नेते संजय राठोड यांनी 28 फेब्रुवारीला राजीनामा दिला होता.