मुंबई : महाविकास आघाडी सरकारला मुंबई हायकोर्टाने मोठा धक्का दिला आहे. दरमहा 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्याचे आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केले होते. याबाबत डॉ. जयश्री पाटील यांनी सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. त्यामुळे हायकोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले. सीबीआयला 15 दिवसात आरोपांची चौकशी करायची आहे.
मुंबई हायकोर्टानं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय दिला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावतीने अनिल देशमुख यांच्याविरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात 31 मार्चला युक्तिवाद झाला. परमबीर सिंग यांच्यावतीनं वकील विक्रम ननकानी यांनी बाजू मांडली. परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली होती. जयश्री पाटील यांनी देखील अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती.
याप्रकरणी आणखी तीन याचिकावरही सुनावणी झाली. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठात सुनावणी झाली.मुंबई हायकोर्टानं अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचा दिलेला निर्णय देशमुख यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.
मुंबई हायकोर्टानं अॅड. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देताना सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली आहे. सीबीआला 15 दिवसांमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करावी लागणार आहे. मुंबई हायकोर्टानं जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निरीक्षण नोंदवलं की, अनिल देशमुख हे गृहमंत्री आहेत त्यामुळे पोलिसांकडून याचा निष्पक्ष तपास होऊ शकत नाही.
आज मी खूप खुश आहे. उच्च न्यायालयाने माझ्या याचिकेवर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं आहे. १५ दिवसात अहवाल द्यायचा आहे. मला हे सांगायचं आहे, अनिल देशमुख तुम्ही गृहमंत्री असलात, तुमच्या अंडर महाराष्ट्र पोलीस आहे, त्यामुळे तुम्ही ही चौकशी योग्य प्रकारे करु शकत नाही. त्यामुळे कोर्टाने सीबीआयकडे प्राथमिक चौकशी दिली आहे. यामध्ये मलाही बोलावण्यास सांगितलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मला हे सांगायचं आहे, अनिल देशमुख तुम्ही पॉवरफुल मराठा नेते असाल, शरद पवारांचे तुमच्यावर वरदहस्त असाल, तरी तुम्ही कायद्यापेक्षा, संविधानापेक्षा मोठे नाही. भलेही तुम्ही माझं नाव पोलीस डायरीत येऊ दिलं नाही. सरन्यायाधीशांनी म्हटलंय, यांचं नाव डायरीत का नाही, हे दबावतंत्र आहे. शरद पवारांकडून हा दबाव आणलाय.
* अनिल देशमुख तुम्ही कायद्यापेक्षा मोठे नाही
डायरेक्टर जनरल सीबीआय हे चौकशी करतील, आणि मला बोलावलं जावं असं कोर्टाने म्हटलं आहे. फक्त माझीच याचिका कोर्टाने ऐकली. कोर्टाने माझं खूप कौतुक केलं, कोणीतरी एक शूर आहे, जे समोर आले आहेत. एवढ्या मोठ्या १०० कोटीच्या प्रकरणात कोणी एक तरी शूर आहे जे समोर आले आहेत, असं कोर्ट म्हणालं. मला हेच सांगायचं आहे, अनिल देशमुख ही मोघलाई नाही, तुम्ही कुणाला धमकावू शकत नाही, मी भारतमातेची बेटी, स्वातंत्र्यसैनिकाची मुलगी आहे, तुमच्याविरोधात उभी आहे.
* ॲड. जयश्री पाटील कोण आहेत ?
ॲड. जयश्री पाटील या ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. एल. के. पाटील यांच्या कन्या आहेत. त्यांनी राज्य सरकारच्या मानवी हक्क आयोगाच्या संशोधन विभागाच्या प्रमुख म्हणून काम पाहिलं आहे. या पदावर त्या सात वर्ष होत्या. मानवाधिकाऱ्याच्या मुद्द्यावर लढणाऱ्या वकील म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. त्यांनी मानवाधिकारांबाबत अनेक पुस्तकं लिहिली आहेत.