मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. तब्बल १३ तासांच्या चौकशीनंतर देशमुख यांना अटक करण्यात आली. अनिल देशमुख अनेक दिवसांपासून गायब होते. सोमवारी ते अचानक ईडी कार्यालयात दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर अनिल देशमुख यांना रात्री १२.३० वाजता अटक दाखवण्यात आली.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेरीस सक्तवसुली संचालनालयाने अटक केली. ही अटक टाळण्यासाठी देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती. पण त्यांना दिलासा मिळाला नाही. कठोर कारवाईपासून त्यांना संरक्षण मिळालेच नाही उलट अटकेची कारवाई झाली. ईडीने या अटकेची माहिती रात्री उशिरा दिली आहे. पाच समन्स पाठवल्यानंतर अनिल देशमुख सोमवारी सकाळी ११ वाजता ईडीच्या कार्यालयात वकीलासह हजर झाले होते.
ईडीचे मुंबईतील अधिकारी सुलतान यांनी सकाळी अकरापासून देशमुख यांची चौकशी सुरू केली होती. रात्री आठनंतर ईडीचे दिल्लीतील अधिकारी सत्यव्रतसिंह हे मुंबईत दाखल झाल्यानंतर देशमुख यांना अटक होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. शेवटी हीच चर्चा खरी ठरली.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) November 1, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ईडीच्या अटकेच्या कारवाईपूर्वी देशमुख यांनी एक निवेदन प्रसिद्धिस दिले होते. त्यात त्यांनी म्हटले होते की परमबीर सिंह, सचिन वाझे यांनी माझ्यावर केलेल्या बिनबुडाच्या आरोपांनंतर ईडी, सीबीआयकडून सुरू असलेल्या चौकशीला मी पूर्ण सहकार्य केले. मला पाठवलेल्या समन्सलाही मी लेखी स्वरूपात उत्तर देत आलो.
उच्च न्यायालयाने मला सांविधानिक हक्कांतर्गत विशेष कोर्टात जाण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तरीही मी आज ईडीच्या कार्यालयात स्वतः हजर राहून पुढील चौकशीस सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंह गेले ४ महिने बेपत्ता आहेत, यातूनच त्यांच्या आरोपांतील खोटारडेपणा समजतो आहे. त्यांच्यावरही अनेकांनी गंभीर आरोप केले आहेत. याचाही विचार व्हायला हवा, असे त्यांनी म्हटले होते.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह भारत सोडून पळून गेल्याच्या बातम्या येत आहेत. माझ्यावर आरोप करणारी व्यक्तीच पळून गेली आहे. परमबीर यांच्यावर पोलीस खात्यातील अनेकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. सचिन वाझेने परमबीर सिंह यांच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले. याआधी तो तुरुंगात होता. मी गृहमंत्री असताना त्याला नोकरीतून काढण्याची प्रक्रिया सुरू केली, त्यामुळे त्याने माझ्यावर आरोप केले, असा दावाही देशमुख यांनी केला.