नाशिक : किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी कोरोना लसीबद्दल एक विधान केल्याने खळबळ उडाली आहे. मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही, असं विधान त्यांनी नाशिकच्या एका कार्यक्रमात केलं आहे. तसेच प्रत्येक माणसाची इम्युनिटी पावर ही वेगवेगळी आहे. प्रत्येकाची मेंदूची क्षमता वेगवेगळी आहे. मी तर लस घेतलेली नाहीये आणि घेणारही नाही. काही होतच नाही तर घेऊन काय करणार, कोरोनावर एकच औषध आहे, मन खंबीर ठेवा. असंही ते म्हणाले.
घोटी कृषी उत्पन बाजार समितीत शेतकरी मेळावा आणि इंदुरीकर महाराज यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५००हून अधिक लोकांची उपस्थिती होती, सोबतच महाविकास आघाडीचे स्थानिक नेते देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
महाराष्ट्रासह देशाभरात नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी म्हणून शासन प्रशासन प्रयत्नांची पराकष्ठा करत आहेत. मात्र कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी लसीकरणाविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटू शकते. यापूर्वी त्यांनी मुलगा आणि मुलीच्या जन्मावरुन त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर इंदुरीकर महाराजांनी पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य केलंय.
ज्याची त्याची प्रतिकार शक्ती वेगळी आहे हे कळायला नको का. प्रत्येकाच्या मेंदूची क्षमता देखील वेगळी आहे. मी सगळीकडे फिरतो. मी तर लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतचं नाही तर घेऊन करायचे काय?” असं विधान त्यांनी केलं आहे. सोबतच कोरोनाला एकच औषध आहे मन खंबीर ठेवा. १४ वर्षे राम वनवासाला गेले होते तर सीतेला सोबत घेऊन गेले होते. इथे राम १४ दिवस क्वारंटाईन झाला तर सीतेने डोकवून पाहिला नाही, असं इंदुरीकर महाराजांनी म्हटले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोना काळात शिक्षित लोकांनी चुकीचं वर्तन केलं. आपल्याच घरातील प्रिय व्यक्तींना, जवळच्या व्यक्तींना अतिशय चुकीच्या पद्धतीने वागवलं. त्यांना चांगल्या ताटात जेवणं दिलं नाही. त्यांच्या अंथरायच्या पांघरायच्या गोधड्या जाळल्या. त्यांच्या हाताला स्पर्श होणार नाही, इतकं फटकून त्यांच्याशी वागले. इथं हात लावू नको, तिथं हात लावू नका.. अशी सगळी कोरोना काळात परिस्थिती होती. पण मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही. काही होतंच नाही तर लस कशाला घ्यायची”, असं इंदोरीकर महाराज म्हणाले.
कोरोना आणि लसीविषयी अधिक स्पष्टीकरण देताना ते उपस्थितांना म्हणतात, “कोरोना काळात अनेकांचं निधन झालं, ज्यातली निम्मी माणसं हे टेन्शनने गेली. प्रत्येकाची इम्युनिटी पॉवर ही वेगवेगळी आहे. प्रत्येकालाच कोरोना होत नसतो. कोरोनावर मन खंबीर ठेवणं हाच उपाय आहे”, असं ते म्हणाले.
कोरोना महामारीत किर्तनकार इंदुरीकर यांनी एक लाखांची मदत दिली होती. सोबतच लॉकडाऊन काळात संगमनेर तालुक्यातील कुटुंबाची होणारी संभाव्य उपासमार टाळण्यासाठी महाराजांनी ओझर, रहिमपूर, कोकणगाव, वडगापान येथील काही गरीब कुटुंबाना धान्याचे वाटप केले होते.
दरम्यान, याआधी देखील किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. इंदुरीकर महराज यांनी महिलाबाबत अक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवरून संगमनेर कोर्टात PCPNDT अंतर्गत इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल झाला होता. आता पुन्हा एकदा लसीकरणावरून केलेल्या विधानामुळे चर्चा होत आहे.