अक्कलकोट : दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी येथे मोटरसायकलवरून गावी निघालेल्या पती-पत्नीला ट्रॅक्टरने धडक दिल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती जखमी झाला. अपघाताची नोंद वळसंग पोलिस ठाण्यात झाली आहे.
मंगल प्रभाकर कोनापूरे (वय ३० रा.इंगळेवस्ती नेताजी शाळेसमोर, एमआयडीसी रोड, सोलापूर) असे अपघातात ठार झालेल्या पत्नीचे नाव आहे. तर पती प्रभाकर नागप्पा कोनापुरे (वय ४०) हे जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद वळसंग पोलिस ठाण्यात झाली आहे.
मिळालेली माहिती अशी की, वरील दोघे कोनापुरे पती-पत्नी आपल्या मोटरसायकलवरून पानमंगरूळ या गावी दिवाळीनिमित्त दर्शनासाठी निघाले होते. सकाळी सात ते साडेसात दरम्यान होटगी ते होटगी स्टेशन दरम्यान असलेल्या हत्तुरे मंगल कार्यालयासमोर सोलापूरच्या दिशेने कारखान्याकडे निघालेल्या ट्रॅक्टरने जोराची धडक दिली.
यामध्ये पत्नी मंगल या खाली पडल्या. ट्रॅक्टरचे चाक मयत मंगल कोनापुरे यांच्या डोक्यावरून गेल्याने त्या जागीच ठार झाल्या. पती प्रभाकर कोनापुरे यांच्या दोन्ही पायाचे हाड फ्रक्चर झाले. यामुळे ते गंभीर जखमी झाले. आपल्या डोळ्यादेखत पत्नीचा झालेला मृत्यू पाहून ते काही काळ बेशुद्ध पडले होते. त्यांच्यावर सोलापुरात उपचार सुरू आहेत.
याप्रकरणी प्रभाकर कोनापुरे यांनी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध फिर्याद दिली आहे. वळसंग पोलिस ठाण्यात फिर्यादीच्या पत्नीच्या मरणास व फिर्यादीला जखमी करणेस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास फौजदार पाटील करीत आहेत.
* विविध ठिकाणी एसटीवर दगडफेक;दोन चालक जखमी
सोलापूर : कोंडी आणि वडकबाळ परिसरात एसटी बसवर झालेल्या दगडफेकीत दोन बस चालक जखमी झाले. या घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडल्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सोलापूर येथून मंद्रूपच्या दिशेने जाणाऱ्या एसटीवर वडकबाळ येथील पुलावर दुचाकीवरील इसमाने समोरून दगडफेकल्याने काच फुटून मार लागल्याने पंडित चंद्राम अडोळे (वय ५४ रा.मंद्रूप) हे बस चालक जखमी झाले ही घटना काल रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली . त्यांना मंद्रूप येथे प्राथमिक उपचार करून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर पुण्याहून सोलापूरच्या दिशेने येणाऱ्या एसटीवर कोंडी परिसरातील हॉटेल आर्यन जवळ समोरून एका इसमाने दगडफेकल्याने काच फुटून बाळासाहेब धोंडीराज नागरगोजे(नागरदरा जि. ) हे चालक जखमी . ही घटना काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास . याची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
* महिलेच्या गळ्यातील दीड लाखाचे मंगळसूत्र चोरट्यांनी पळविले
सोलापूर – दुचाकीवरून उतरून पायी घराकडे जाणार्या एका महिलेच्या गळ्यातील दीड लाखाचे मंगळसूत्र दुचाकीवरील चोरट्यांनी हिसका मारून तोडून नेले ही जबरी चोरीची घटना नवीन आरटीओ कार्यालया जवळील वृंदावन सोसायटी जवळ आज गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली.
लक्ष्मी गजलप्पा मंथनगौडा( रा. वृंदावन सोसायटी) या सकाळी दहा वाजेच्या सुमारास दिवाळीचे पूजेचे साहित्य घेऊन आपल्या मुलीसोबत दुचाकीवरून घराकडे आल्या होत्या.सोसायटीसमोर ड्रेनेजचे काम चालू होते. त्यामुळे त्या दुचाकीवरून उतरून पायी घराकडे निघाल्या होत्या. त्यावेळी समोरून दुचाकीवरून आलेल्या दोघा तरुणांपैकी एका तरुणाने खाली उतरून त्यांच्या गळ्यातील ५५ ग्राम सोन्याचे मंगळसूत्र हिसका मारून तोडून घेतले. दुचाकीवर बसून राजस्व नगरच्या दिशेने पसार झाला. या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिसात झाली. सहाय्यक फौजदार कोल्हाळ पुढील तपास करीत आहेत .