अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील शिरवळजवळ कुंभार यांच्या शेताजवळील वळणावर कार व दुचाकीच्या भीषण अपघातात एक तरुण जागीच ठार झाला तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तर सांगोल्यात शेतजमिनीच्या वादातून भावानेच भावाचा खून केल्याची घटना घडलीय. याच रस्त्यावर दुपारी १ च्या सुमारास अपघातात ६ वर्षीय चिमुकलीने प्राण गमावले असल्याचेही वृत्त आहे.
अक्कलकोटच्या अपघाताची घटना शुक्रवार (५ नोव्हेंबर) सायंकाळी ८ वाजता घडली आहे. सिद्धाराम भिमाशंकर कोळी (वय २८ रा सदलापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. राजकुमार विश्वनाथ भोसगी व गजानन रामलिंग मुलगे हे जखमी झाले आहेत. या घटनेची फिर्याद मयताचा मोठा भाऊ मल्लिकार्जुन भिमाशंकर कोळी यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात दिली आहे. यावरुन गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी की, मयत सिद्धाराम भिमाशंकर कोळी (वय २८ रा. सदलापूर) हा सकाळी ११ वाजता त्याच्या मुलीचे जावळ काढण्यासाठी राजकुमार विश्वनाथ भोसगी व गजानन रामलिंग मुलगे (दोघे रा. सदलापूर ) या दोन्ही मित्रासोबत एकाच दुचाकीवरून वागदरी (ता. अक्कलकोट) येथे गेले होते. जावळ कार्यक्रम उरकून गावाकडे परतीचा प्रवास करीत असताना कुंभार यांच्या शेताजवळील वळणावर समोरून येणाऱ्या भरघाव वेगाने चारचाकी कारने ( क्र. एम एच ०५ इ ए ५०५८) समोरून दुचाकीस्वाराना जोरात धडक दिली.
या धडकेत दुचाकीवरील तिघेजण खाली पडून गंभीर जखमी झाले. त्यापैकी मयत सिद्धाराम भिमाशंकर कोळी (वय २८) यास डोक्यास गंभीर मार लागल्याने जागीच ठार झाला. तर सोबत असलेले राजकुमार विश्वनाथ भोसगी याच्या पायाला गंभीर दुखापत तर गजानन रामलिंग मुलगे याच्या हाताला गंभीर मार लागला आहे. त्या दोघांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे. या अपघातात दुचाकी व चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले अहे. कारमधील ४ जण जखमी झाले आहेत. कार चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
याच रस्त्यावर दुपारी १ च्या सुमारास अपघातात ६ वर्षीय चिमुकलीने प्राण गमावले आहे. त्यानंतर सायंकाळी हा दुसरा अपघात झाला आहे. यामध्ये ही एक तरुणाने प्राण गमावले तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अधिक तपास सपोनि महेश भावीकट्टी हे करीत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* शेतजमिनीवरुन भावाने केला भावाचा खून
सांगोला : ऐन दिवाळीत भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला सांगोल्यात अप्रिय घटना घडलीय. शेतजमिनीच्या कारणावरून चिडलेल्या भावाने झोपेतच सख्ख्या भावाच्या डोक्यात काहीतरी मारुन त्यास जीवे ठार मारून खून केला आहे.
ही घटना शुक्रवारी मध्यरात्री रात्री १२:३० च्या सुमारास (अकोला ता. सांगोला) येथील चिंचमळा वस्तीवर घडली.समाधान सुखदेव कदम (वय ३४) असे मृताचे नाव आहे. याबाबत मृताची पत्नी गीतांजली समाधान कदम यांनी फिर्याद दिली , पोलिसांनी तात्यासाहेब उर्फ संतोष सुखदेव कदम (रा.अकोला , चिंचमळा ) याचे विरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मयत समाधान सुखदेव कदम यांची जनावरे सख्ख्या भाऊ तात्यासाहेब उर्फ संतोष सुखदेव कदम यांच्या शेतात जात होती तर शेत जमिनीच्या बांधाच्या कारणावरून मागील सात-आठ महिन्यांपासून तात्यासाहेब हा भाऊ समाधान यास शिवीगाळी दमदाटी करीत भांडण करीत होता. तो त्यास तुला तीन मुली आहेत, तुला जमीन कशाला पाहिजे , मला दोन मुले आहेत, मला जमीन पाहिजे, असे म्हणून तुम्हा दोघांनाही महिन्यात खल्लास करतो अशी धमकी त्याने दिली होती.
समाधान हा चिंचमळा येथील वस्तीवर झोपला असताना मध्यरात्री १२:३० च्या सुमारास तात्यासाहेब उर्फ संतोष कदम यांनी भाऊ समाधान हा झोपेत असताना काहीतरी त्याच्या डोक्यात घालून जीवे ठार मारून खून केला. त्याने एवढ्यावरच न थांबता आज शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे जनावरांच्या गोठ्यातील शेण गहाण काढून घरात निवांत बसला होता.
या घटनेची माहिती वडील सुखदेव कदम यांनी समाधानची पत्नी गीतांजली हीस कळवली तर पोलीस पाटील यांनी सदर घटनेची माहिती सांगोला पोलीस स्टेशनला दिली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू बनकर यांनी भेट देऊन पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिले. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी राजूलवार करीत आहेत