माढा : माढा तालुक्यातील वडशिंगे येथील स्टॅम्प व्हेंडर सुरेश कदम यांच्या घरावर आज शनिवारी पहाटे सव्वाएक वाजणेचे सुमारास दरोडा पडला. यात 2 लाख 8 हजार 500 रूपयांचा सोनेचांदीचा ऐवज व रोख रक्कम चोरीला गेली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी घटनास्थळी तातडीने सकाळीच भेट दिली. संबंधितांना तात्काळ तपासाबाबत सूचना दिल्या आहेत. आणखी इतर घरांवर दरोडा पडणार होता, मात्र ग्रामसुरक्षा दल सतर्क झाल्याने चोरट्यांचा हा डाव फसला.
दरोडेखोरांच्या मारहाणीत सुरेश कदम यांच्यासह त्यांची पत्नी वैशाली, मुलगा रितेश जखमी झाले आहेत. माढ्यातील खाजगी रूग्णालयात ते उपचार घेत आहेत. दरम्यान ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेमुळे इतर ठिकाणी दरोडे टाकण्याचे दरोडेखोरांचे मनसुबे धुळीला मिळाले. मात्र या दरोड्यामुळे वडशिंगे परिसरात घबराट निर्माण झाली आहे.
वडशिंगे गावातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या सुरेश कदम यांच्या घरावर शनिवारी पहाटे दरोडेखोरांनी हाॅलचा दरवाजा ढकलून व कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरात प्रवेश करून लाकडी दांडके व लोखंडी पाईपने मारहाण केली. कपाटातील रोख नव्वद हजार रूपये, ऐंशी हजार रुपयांचे सोन्याचे गंठण, सोळा हजार रुपयाच्या दोन अंगठ्या, वीस हजार रुपयांचे फुले – झुबे, दोन हजार रुपयांचे पैंजण, पाचशे रुपयांचे जोडवे असा दोन लाख आठ हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरट्यांनी नेला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याबाबत सुरेश कदम यांनी माढा पोलिसात फिर्याद दिली आहे. सुरेश कदम यांच्या घरानंतर निमगाव रोडला असलेल्या कदम यांच्या घराकडे दरोडेखोरांनी मोर्चा वळवला. मात्र तोपर्यंत ग्रामसुरक्षा दल सतर्क झाले होते. कदम यांच्या घरातील लोक ग्रामसुरक्षा दलाच्या फोनमुळे जागे झाल्याने दरोडेखोरांनी गावातून पळ काढला. पोलिसांनी तातडीने हालचाली करत ठिकठिकाणच्या ग्रामसुरक्षा दलांना सतर्क करत नाकाबंदी केली. मात्र दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही.
माढा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शाम बुवा यांनी रात्रीच वडशिंगे गावात दरोडा पडलेल्या घराला भेट देऊन पाहणी केली. श्वान पथक व फिंगरप्रिंट तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. जखमींवर माढ्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. वडशिंगे येथील दरोड्याच्या घटनेने या परिसरातील लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्मण झाले आहे. वाड्या वस्त्यांवरील लोकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शाम बुवा करीत आहेत.